– अमरावती अप्पर आयुक्तांचा मनोज लाहूडकर यांना दणका; विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याला स्थानिक आमदारांना न बोलावणे भोवले!
चिखली (महेंद्र हिवाळे) – तालुक्यातील उदयनगरचे सरपंच मनोज लाहूडकर यांना पदावरून अपात्र घोषित करण्यात आले आहे. अमरावती विभागाचे अप्पर आयुक्त सूरज वाघमारे यांनी हा निकाल जाहीर केला. शासकीय निधीतून करण्यात आलेल्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याला राजशिष्टाचाराप्रमाणे विद्यमान आमदार श्वेताताई महाले पाटील यांना न बोलाविता, त्यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांना बोलावले होते. विभागीय चौकशीत त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने त्यांना पदावरून अपात्र घोषित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या संदर्भात स्थानिक गटविकास अधिकारी व ग्रामसेवकांच्या सूचनांनाही लाहूडकर यांनी धुडकावून लावल्या होत्या.
सविस्तर असे, की उदयनगर ग्रामपंचायतीचे सरपंच मनोज सारंगधर लाहूडकर यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम ३९(१) नुसार अपात्र घोषित करण्यात आले आहे. शासन परिपत्रक दिनांक २७ जुलै २०२५ मधील निर्देश, तसेच राज्य शासनाच्या निधीअंतर्गत चालणार्या कामांबाबत आवश्यक सूचना असूनही त्यांनी त्या जाणूनबुजून पाळल्या नाहीत, असे आदेशात नमूद आहे. अप्पर आयुक्त अमरावती यांनी केलेल्या या कार्यवाहीमुळे जसे शासकीय अधिकारी यांना नियमानुसार कायद्याने काम करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी यांनीदेखील नियम व कायदा यांचा मान राखला पाहिजे, असा धडा मिळाला आहे.

