बिबी (ऋषी दंदाले) – लोणार तालुक्यातील किनगावजट्टू येथील, खापरखेड रोडवरील स्मशानभूमीमध्ये रक्षाविसर्जनाला वृक्षरोपणाचा पायंडा पाडून गावकर्यांनी नवा आदर्श प्रस्थापित केला आहे.
किनगावजट्टू येथील खापरखेड रोडवरील स्मशानभूमीमध्ये लोकसहभागामधून कायापालट झाला असून, बसण्याची व्यवस्था, साफसफाई, स्वच्छता, पाण्याची व्यवस्था, तणनाशक फवारणी, वृक्षरोपण आदी कामे केल्या गेली आहेत. मानवाचे अंतिम संस्कार हे स्वच्छ सुंदर तसेच निसर्गरम्य वातावरणात व्हावे, यासाठी येथील ग्राम विकास अधिकारी विनोद सातपुते, तसेच सामाजिक कार्यकर्ते राजेश नागरे हे सातत्याने प्रयत्न करत आहेत. स्थानिक ग्रामपंचायतीच्या सहकार्याने स्मशानभूमी शेड, पाण्याची टाकी, संडास व मुतारी आदी कामे पूर्ण झाले असून, संपूर्ण स्मशानभूमीच्या परिसराला तार कंपाऊंडचे काम जलदगतीने पूर्णत्वास जात आहे. त्यामुळे अंत्यविधीच्या कार्यक्रमाला बाहेरगावावरून आलेली पाहुणे मंडळी, आश्चर्यचकीत होत असून, स्मशानभूमीच्या बाबतीत, किनगावजट्टूचे नाव जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरले आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी, तसेच मृत व्यक्तीची आठवण राहावी म्हणून, रक्षाविसर्जनाच्या कार्यक्रमाला वृक्षरोपण करण्यात येत असल्याने नवा पायंडा या गावातील ग्रामविकास अधिकारी विनोद सातपुते यांच्यासह ग्रामस्थांनी पाडला आहे.