– बिहार मोहिमेनंतर विनोद तावडेंचे राज्यात पुनरागमन; स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत बजावणार महत्वपूर्ण जबाबदारी
– निवडणुकांसाठी भाजपची व्यापक रणनीती!
मुंबई (धम्मप्रिया कांबळे) – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपसह महायुतीचा झेंडा फडकविण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या शिर्ष नेतृत्वाने व्यापक राजकीय रणनीती आखली असून, बिहार मोहिमेनंतर पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे राज्यात परत येणार आहेत. त्यांच्यासह मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मानाचे पान देत स्टार प्रचारकांच्या यादीत भाजपने या नेत्यांना स्थान दिलेले आहे. या शिवाय, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, पंकजा मुंडे हे नेतेही ग्रामीण भाग पिंजून काढण्यासाठी सज्ज झालेले आहेत.
राज्यातील गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला अखेर मुहूर्त लागला असून, भाजपाने या निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती. यात बिहार मोहिमेतील यशानंतर विनोद तावडेंचे महाराष्ट्रात कमबॅक झाले आहे. याशिवाय, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि शिवेंद्रराजे भोसले यांनाही पाच वर्षांत भाजपामध्ये मानाचे पान देण्यात आले. भाजपकडून जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे, पीयूष गोयल, नारायण राणे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, आशीष शेलार, मुरलीधर मोहोळ, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, गणेश नाईक, जयकुमार रावल आणि इतर नेत्यांचा समावेश आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष कामाला लागलेले आहेत. पहिल्या टप्प्यात २४४ नगरपालिका आणि ४४ नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत, तर दुसर्या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. तिसर्या टप्प्यात महापालिकांच्या निवडणुका पार पडतील. त्यामुळे, येत्या काळात या निवडणुकीत राष्ट्रवादी-शिवसेना यांच्यातील संघर्ष कसा रंग घेतो, तसेच भाजपाच्या प्रचारकांच्या मोहिमेचा परिणाम कसा होतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

