भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात उमेदवारीसाठी रस्सीखेच; तर महाविकास आघाडीत शांतता!

admin 4 Min Read
4 Min Read

– जिल्हा परिषदेसाठी शेंदुर्जन गटात कुणाला तिकीट अन् कोण मारणार बाजी?
– महायुतीकडून सौ. सुरेखा नागरे, सौ. वर्षाताई उगलमुगले तर महाआघाडीकडून सौ. कुंदाताई देशमुख, सौ. मनिषा शिंगणे, सौ. शीला बोडखे इच्छूक!

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – शेंदुर्जन जिल्हा परिषद गटात आरक्षण सोडतीनंतर अनेक उमेदवारांनी आपली उमेदवारी जवळपास निश्चित समजून गावभेटीला प्राधान्य दिले आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप उमेदवारांनी संपर्क साधने सुरु केले आहे. तर महाविकास आघाडीत स्मशान शांतता असून, नेमका कोणता उमेदवार निवडणूक रिंगणात राहिलं, हे गुलदस्त्यातच आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार मनोज कायंदे यांच्या जवळचे विश्वासू सहकारी ग्रामपंचायत अधिकारी अविनाश नागरे यांच्या पत्नी सौ. सुरेखा नागरे यांनी शेंदुर्जन जिल्हा परिषद गटातून उमेदवारी पक्षाकडे मागितली आहे. काल पक्षनिरीक्षकांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. परंतु, महायुतीत ही जागा कोणाला सुटणार हे अनिश्चित आहे. तरीही त्यांनी संपर्क साधने सुरु केले आहे. त्यांचे सासरे भंडारी येथील माजी सरपंच बाबुराव नागरे यांनी केलेल्या कामाची ओळख ही त्यांची जमेची बाजू आहे. बाबुराव नागरे यांनी भंडारी ग्रामपंचायत सतत अविरोध निवडून आणून एक आदर्श प्रस्थापित केले आहे. ते ग्रामसेवा सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष आहेत. तर अविनाश नागरे या भागात अनेक वर्षे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कामकाज केले आहे. आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कारसुध्दा त्यांनी मिळवला आहे. सुरेखा नागरे यांचे वडील मदनराव कायंदे हे शेंदुर्जन ग्रामपंचायतीचे उपसरपंच राहिले आहेत. याचा राजकीय वारसा म्हणून त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यासाची इच्छा व्यक्त केली आहे. तर भाजपा पक्षाकडून जागदरी येथील माजी सरपंच वर्षाताई शंकरराव उगलमुगले यांनी आपली उमेदवारी जवळपास निश्चित समजून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. त्यांनीसुध्दा गाव भेटीला प्राधान्य दिले आहे. त्यांची राजकीय कारकीर्द म्हणजे १० वर्ष सरपंच म्हणून काम करीत असताना ग्रामपंचायतीला वेगवेगळ्या कामांसाठी १० पुरस्कार मिळाले आहेत. दोन्ही उमेदवार तगडे आव्हान उभे करीत असताना नेमकी ही जागा कोणाला सुटणार, हे येणारा काळच ठरवेल. आज मात्र या गटात दोघांनी घेतलेली प्रचारात आघाडी हा चर्चेचा विषय ठरत आहे. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना (ठाकरे) या दोन पक्षांत उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून माजी कृषी सभापती दिनकरराव देशमुख यांच्या पत्नी सौ. कुंदाताई दिनकरराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार प्रदेश सरचिटणीस नितीन शिंगणे यांच्या पत्नी मनिषा नितीन शिंगणे, शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंद्री बोडखे यांच्या पत्नी शीला बोडखे निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. डॉ. राजेंद्र शिंगणे यांची होमपिच म्हणून साखरखेर्डा आणि शेंदुर्जन जिल्हा परिषद गट आहेत. त्यांनी दिलेला उमेदवार याकडे जनतेचे मत असते. त्यामुळे शेंदुर्जन जिल्हा परिषद निवडणूक ही खूपचं रंगतदार होणार आहे. शेंदुर्जन पंचायत समिती गणातून सेवानिवृत्त शिक्षक संतोष चेके हे प्रबळ दावेदार आहेत. गेली अनेक वर्षे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा सचिव म्हणून त्यांनी काम केले आहे. शिक्षक या नात्याने त्यांचा ग्रामीण भागात चांगला संपर्क आहे. त्यांना अपेक्षा आहे की गुरुदक्षिणा म्हणून त्यांच्या झोळीत मतांचे दान टाकतील. तर युवा चेहरा म्हणून आदित्य काटे हेसुद्धा प्रबळ दावेदार आहेत. जिल्हा परिषद संधी न मिळाल्यास नितीन शिंगणे हे सुद्धा पुन्हा पंचायत समितीचे उमेदवार म्हणून राहू शकतात. मागील वेळी त्यांचा बंद्री बोडखे यांनी पराभव केला होता. मलकापूर पांग्रा पंचायत समिती गणातही उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. परंतु, कोण कोणत्या पक्षाकडे आहे हे येणारा काळच ठरवेल.

Share This Article
Exit mobile version