सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – तालुक्यातील किनगावराजा पोलीस स्टेशन अंतर्गत आज (दि.१२) सकाळी साडेसातच्या सुमारास राहेरी शिवारातील ताडशिवणी लिहिलेल्या पाटीजवळ एक हृदयद्रावक घटना घडली. ताडशिवणी येथील रामकिसन विश्वनाथ शितोळे (वय ५३) यांनी लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे आणखी एका शेतकर्याचा बळी गेल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, गावात शोककळा पसरली आहे. मृतक हे शेतकरी असून, त्यांनी शेतीतूनच उपजीविका चालवली होती. घटनास्थळी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, त्यांनी सकाळी घरून बाहेर पडून राहेरी शिवारातील पाटीजवळ गळफास घेतल्याचे आढळून आले. याबाबत फिर्यादी भागवत शिवाजी शितोळे (वय ३५, व्यवसाय-शेती, रा. ताडशिवणी, ता. सिंदखेडराजा) यांनी किनगावराजा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी कायमी मर्ग अंतर्गत नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच किनगाव राजा पोलीस स्टेशन चे ठाणेदार संजय मातोंडकर यांच्या आदेशानुसार पोहेका काकड (बॅ. नं. ४२०) व पोहेका चव्हाण (बॅ. नं. १७६३) यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन सरकारी दवाखान्यात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या घटनेने ताडशिवणी आणि राहेरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, ‘शेतीतून उदरनिर्वाह करणार्या शेतकर्याने अशी पावले उचलावी लागणे हे दुर्देवी आहे,’ अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांतून उमटत आहेत. सततची नापिकी, सरकारचे शेतकरीविरोधी धोरण व डोक्यावरील कर्जाचा डोंगर यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.