मेहकरचा नगराध्यक्ष काँग्रेसचाच होणार; येणारा काळही काँग्रेसचाच : हर्षवर्धन सपकाळ

admin 3 Min Read
3 Min Read

– तीनदा आमदार, चारदा खासदार तरीही मेहकर नगरपरिषदचा ‘मेळ’ लागला नाही; नाव न घेता ना. जाधवांवर टीकास्त्र!
– मेहकर येथे काँग्रेसच्या सभेला गर्दी; स्वतंत्र मैदान खचाखच!

मेहकर/बुलढाणा (बाळू वानखेडे) – साम, दाम, दंड, भेदचा वापर करत अख्खा देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकायला काढला. राज्यात महिला सुरक्षित नाही तर जमिनी लाटल्या जात आहेत. महागाई वाढत असताना शेतमालाला मात्र भाव नाही. त्यामुळे सामान्य माणूस त्रस्त झाला असून, दुसरीकडे ‘हम करे सो कायदा’मुळे संविधानालाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सामान्य माणसाच्या हितासाठी तसेच जनतेला न्याय मिळावा यासाठी मेहकरचा नगराध्यक्ष काँग्रेसचाच होईल, तर देशात, राज्यात येणारा काळही काँग्रेसचाच असेल, असा ठाम विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला. तर तीनवेळा आमदार, चारवेळा खासदार होऊनही त्यांना नगरपालिकेचा मेळ लागला नाही, असा जोरदार टोलाही त्यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे नाव न घेता, त्यांना लगावला. मेहकर नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक स्वतंत्र मैदान येथे काँग्रेसच्या मेळाव्याचे आयोजन काल, दि.९ नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बोलत होते. सदर मेळाव्याला मोठी गर्दी जमली होती तर स्वतंत्र मैदान खचाखच भरले होते. एकंदरीत काँग्रेसने स्वबळाची भाषा केल्याने मेहकर नगरपरिषद निवडणूक महाविकास आघाडीतील घटकपक्ष आता वेगवेगळे लढणार की, ही जागा काँग्रेसला सुटणार, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर यांनी मेहकर नगरपालिकेत काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणा, असे आवाहन आपल्या भाषणातून केले. प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मणराव घुमरे यांनी येथील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार काँग्रेसच्या भरवशावर निवडून आले आहेत. मेहकर काँग्रेसचा बालेकिल्ला असताना लोक पंजा विसरतात की काय, अशी भीती आता वाटू लागली आहे. त्यामुळे मेहकर नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसचा उमेदवार पाहिजेत, आपण त्याला निवडूणही आणू, असे सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, आमदार धीरज लिंगाडे, पक्षनिरीक्षक राजेंद्र राख, प्रदेश सचिव रामविजय बुरूंगुले, नगराध्यक्ष पदाचे इच्छुक उमेदवार कासम गवळी व विलास चनखोरे, पक्षनेते अनंतराव वानखेडे, माजी सभापती नंदकिशोर बोरे, अशोकराव पडघान, विधानसभा समन्वयक देवानंद पवार, तालुका अध्यक्ष प्रदीप देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भास्कर ठाकरे, कलीमखान, सेवादल तालुकाध्यक्ष राजेंद्र गायकवाड, युवक कांग्रेस अध्यक्ष भूषण काळे तसेच नगरसेवक पदाचे इच्छुक उमेदवार सह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक शहर अध्यक्ष पंकज हजारी यांनी केले. बहारदार संचलन अ‍ॅड. माधुरी पवार यांनी केले. आभार शैलेश बावस्कर यांनी मानले. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मेहकर नगर परिषद निवडणूक संदर्भात आढावा बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साहाने आढावा बैठकीचे रुपांतर जाहीर सभेत झाले. बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे, पक्षनिरीक्षक राजेंद्र राख, आमदार धीरज लिंगाडे, प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मणराव घुमरे, प्रदेश सरचिटणीस श्याम भाऊ उमाळकर, प्रदेश सचिव राम विजय बुरुंगले, माजी सभापती अशोकराव पडघान, देवानंद पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
Share This Article
Exit mobile version