– श्री बालाजी सहकारी सूतगिरणीला कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट!
देऊळगावराजा (राजेंद्र डोईफोडे) – जिल्ह्यातील ग्रामीण भागात सहकाराच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीला गती देणार्या श्री बालाजी सहकारी सूतगिरणीला महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आज (दि.९) सदिच्छा भेट देऊन सूतगिरणीच्या कार्याचा आढावा घेतला. जिल्ह्यातील ग्रामीण भागात यानिमित्ताने रोजगार निर्मितीचा आदर्श निर्माण व्हावा, असे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले.
या प्रसंगी मंत्री फुंडकर यांचे सूतगिरणीच्या व्यवस्थापनातर्पेâ स्वागत व सत्कार करण्यात आला. सूतगिरणीच्या स्थापनेपासून आजवरच्या यशस्वी टप्प्यांची सविस्तर माहिती ना. फुंडकर यांना देण्यात आली. जिनिंग, प्रेसिंग व स्पिनिंग या तिन्ही प्रक्रिया एकत्र असणारा हा बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव प्रकल्प असून, सहकाराच्या माध्यमातून शेतकरी उद्धाराचा संकल्प येथे साकार झाला आहे. या सूतगिरणीच्या माध्यमातून सुमारे ५०० लोकांना प्रत्यक्ष तर हजारो लोकांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला आहे. या कार्याबद्दल मंत्री आकाश फुंडकर यांनी समाधान व्यक्त करत, ‘सहकाराच्या माध्यमातून जनतेचा आर्थिक सशक्तीकरणाचा मार्ग उभा राहू शकतो,’ असे प्रतिपादन केले. ही सूतगिरणी आमदार सौ. श्वेता महाले पाटील व त्यांचे वडील अंकुशराव पडघान यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनातून, तसेच विद्याधर महाले (स्वीय सचिव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस) यांच्या प्रशासकीय मार्गदर्शनाखाली उभी राहिली आहे. या सूतगिरणीच्या माध्यमातून महाले दाम्पत्याकडून अधिकाधिक जनसेवा व चिखली विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास घडावा, अशा शुभेच्छा कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिल्या. या प्रसंगी विद्याधर महाले, ऋषभ पाटील, तसेच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय गाडेकर यांची उपस्थिती होती.