सिंचन प्रकल्प, रस्ते यामधून मिळणार्‍या पैशाचा शेतकर्‍यांनी योग्य विनियोग करावा : संदीपदादा शेळके

admin 2 Min Read
2 Min Read

– ‘राजर्षी शाहू मल्टिस्टेट’च्यावतीने संग्रामपूर तालुक्यातील भोन येथे आर्थिक साक्षरता अभियान

संग्रामपूर/बुलढाणा (राजेश लोखंडे) – सिंचन प्रकल्प, रस्ते यामधून मिळणार्‍या पैशाचा शेतकर्‍यांनी योग्य विनियोग करावा, असे प्रतिपादन राजर्षी शाहू मल्टिस्टेटचे संस्थापक संदीपदादा शेळके यांनी केले. राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्यावतीने राबवण्यात येणार्‍या आर्थिक साक्षरता अभियानांतर्गत तालुक्यातील भोन येथे आज, दि. ८ नोव्हेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

याप्रसंगी मंचावर सरपंच राजेश फाळके, पोलिस पाटील गणेश फाळके, आर्थिक विषयाचे तज्ज्ञ तुषार डोडिया यांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना संदीप शेळके म्हणाले, रस्ते, महामार्ग, सिंचन प्रकल्पात जाणार्‍या जमिनीच्या मोबदल्यात शेतकर्‍यांना शासनाकडून एकाचवेळी मोठ्या प्रमाणात पैसा मिळतो. पैसा आणि आर्थिक विषयाची जाण नसल्याने शेतकर्‍यांची फसवणूक होऊ शकते. आमिष दाखवून काही लोक शेतकर्‍यांना गंडा घालतात. याबाबतची अनेक उदाहरणे आपण पाहतो. पैशाची योग्य ठिकाणी गुंतवणूक करता आली पाहिजे, पैसा वाढवता आला पाहिजे. तेंव्हाच जीवनात समृद्धी येऊ शकते. नेमक्या याच उद्देशाने राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्यावतीने आर्थिक साक्षरता अभियान हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. शेतकर्‍यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाला हरिश शेळके, योगेश उन्हाळे, राजू शेळके, अतुल शेळके, जगदीश राठी, अनंता पाटील, श्रीकृष्ण इंगळे, ज्ञानदेव आपतूरकर, राजर्षी शाहू मल्टीस्टेटचे विभागीय व्यवस्थापक सतीश बोहरुपी, शाखा व्यवस्थापक शैलेश काळे, वैभव आढाव, यश ईधोकार, स्वप्नील कुलसुंदर, अश्विन परघरमोल तसेच बहुसंख्य शेतकरी आणि ग्रामस्थ हजर होते.


आर्थिक साक्षरता काळाची गरज – तुषार डोडिया

आज अनेक जणांकडे पैसा आहे. मात्र प्रत्येकजण आर्थिक साक्षर असतोच असे नाही. पैसे कसे वाचवावे, वाढवावे आणि त्याचे नियोजन कसे करावे याबाबत सर्वांना माहिती असायला हवी. त्यामुळे आर्थिक सुरक्षितता लाभते. आपली फसवणूक होऊ शकत नाही. आपल्या कष्टाचा पैसा कोणी हडप करु शकत नाही. आर्थिक साक्षरता काळाची गरज असल्याचे मार्गदर्शनपर विचार आर्थिक विषयाचे तज्ञ तुषार डोडिया यांनी मांडले. राजर्षी शाहू मल्टिस्टेटने सुरु केलेला आर्थिक साक्षरता अभियान हा उपक्रम शेतकर्‍यांसाठी फायद्याचा असल्याचे त्यांनी सांगितले.

Share This Article
Exit mobile version