साखरखेर्डा येथे पणन महासंघाने सोयाबीन केंद्र सुरु करावे!

admin 2 Min Read
2 Min Read

– जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ जाधव यांची मागणी

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – सिंदखेडराजा तालुक्याची व्याप्ती ही मोठी असून, सर्वाधिक सोयाबीन उत्पादक शेतकरी हा साखरखेर्डा भागातील आहे. तसेच उपबाजार समिती येथे स्थापन आहे. त्या अनुषंगाने साखरखेर्डा येथे सोयाबीन खरेदी केंद्र पणन महासंघाने सुरू करावे, अशी मागणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ जाधव यांनी केली आहे.

साखरखेर्डा, शेंदुर्जन, मलकापूर पांग्रा भागातील २० हजारांपेक्षा जास्त येथील शेतकर्‍यांनी सोयाबीनचा पेरा केला होता. एकरी चार ते पाच क्विंटल उत्पादन मिळाले. तर नदीकाठच्या शेतातील सोयाबीन वाहून गेले. जे काही हाती लागले. ते सोंगून काढले. आज शेतकर्‍यांच्या घरात सोयाबीन आहे. परंतु बाजारात भाव मिळत नाही. म्हणून शासनाने हमी भावाने सोयाबीन खरेदी करावे, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे. शासनाने सोयाबीन खरेदी करण्याचे आदेश पणन महासंघाला दिले. यापूर्वी महाराष्ट्र फेडरेशन सोयाबीन खरेदी करीत असे. यावर्षी पणन महासंघाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले. परंतु, साखरखेर्डा ते सिंदखेडराजा हे अंतर ६० किलोमीटरचे असल्याने वाहतूक खर्च शेतकर्‍यांना परवडणारा नाही. त्याच बरोबर चार ते पाच दिवस नंबर लागत नाही. यात शेतकर्‍यांची परवड होऊ शकते. याचा संपूर्ण विचार करून शासनाने साखरखेर्डा येथील कै.भास्करराव शिंगणे उपबाजार समितीत सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करावे. त्यामुळे साखरखेर्डा, सवडद, गुंज, शिंदी, राताळीन, पिंपळगाव सोनारा, तांदुळवाडी, शेंदुर्जन, लिंगा, सायाळा, पांग्रीकाटे, गोरेगाव, बाळसमुद्र, कंडारी, भंडारी, जागदरी, नागझरी, दरेगाव, देऊळगाव कोळ, राजेगाव , झोटींगा, आगेफळ, मलकापूर पांग्रा या गावातील शेतकर्‍यांना दिलासा मिळेल. त्यासाठी साखरखेर्डा येथे खरेदी केंद्र सुरु करावे. साखरखेर्डा येथे प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे आणि बुलढाणा अर्बन, विदर्भ मार्वेâटिंग फेडरेशनचे गोडाऊन उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, माजी कृषी सभापती दिनकरराव देशमुख, माजी सभापती राजू ठोके यांनी पणन महासंघाला दिली आहे.

Share This Article
Exit mobile version