– प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ अॅक्शन मोडवर; उद्यापासून जिल्हा दौरा – तालुकानिहाय पक्ष कामाचा घेणार आढावा!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काँग्रेस जोरदार तयारीला लागली असून, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ राज्य पिंजून काढत असून, उद्या ९ व १० नोव्हेंबररोजी ते जिल्हयाचा दौरा देखील करणार आहेत. या दरम्यान तालुकानिहाय पक्ष कार्याचा आढावा घेऊन ते मतेसुध्दा जाणून घेणार आहेत.
ओबीसी आरक्षणासह इतर कारणावरून लांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने मोकळा केला असून, जानेवारी २०२६ अखेर सदर निवडणुका आटोपण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, आता नगरपरिषद व नगर पंचायत निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून, याच महिन्याअखेर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. सदर निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षानेही जोरदार तयारी चालविली असून, नगर परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती नुकत्याच घेतल्या आहेत, तर जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी इच्छूक उमेदवारांचेही अर्ज घेतले आहेत. दरम्यान, या निवडणुकांसाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन हे जिल्ह्याचा दोन दिवस दौरा करणार असून, पक्षाचा तालुका निहाय आढावा घेऊन कार्यकर्ते व पदाधिकारी यांची मते जाणून घेणार आहेत. यासाठी उद्या, दि. ९ नोव्हेंबररोजी सकाळी १० वाजता चिखली तालुक्याची आढावा बैठक घेण्यात येणार असून, लोणार तालुका दुपारी २ वाजता तर मेहकर तालुक्याची आढावा बैठक दुपारी ४.३० वाजता घेण्यात येणार आहे. दि. १० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता खामगाव तालुका, दुपारी २ वाजता शेगाव तालुका, दुपारी ४.३० वाजता जळगाव जामोद तालुका, सायंकाळी ७ वाजता मलकापूर तालुक्याची आढावा बैठक घेण्यात येणार आहे. रात्री ९.३० वाजता येथून ते मुंबईकडे रवाना होणार आहेत, अशी माहिती सरचिटणीस अॅड. अमित कारंडे यांनी दिली आहे. तरी सदर बैठकीला पक्षाचे जिल्हाध्यक्ष, जेष्ठ नेते, आजी माजी खासदार व आमदार, जिल्हा प्रभारी, सह प्रभारी, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती माजी पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, विविध आघाड्या, सेल, सोशल मीडिया पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे, अधिक माहिती साठी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांचेशी संपर्क करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.