राज्यात निवडणुकांचा बिगुल वाजला; आजपासून आचारसंहिता लागू!

admin 7 Min Read
7 Min Read

– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; २४६ नगरपरिषद, ४२ नगरपंचायतींसाठी होणार मतदान
– २ डिसेंबरला मतदान, तर ३ डिसेंबरला मतमोजणी
– २४६ नगरपरिषद अणि ४२ नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर

मुंबई (धम्मप्रिया कांबळे) – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला असून, राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज (दि.४) दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेत, या निवडणुकांची घोषणा केली. या घोषणांमुळे राज्यात आजपासून आदर्श आचारसंहितेची अमलबजावणी सुरू झाली आहे. निवडणुकीस पात्र असलेल्या २४६ नगरपरिषदा आणि एकूण ४२ नगरपंचायतीच्या निवडणुका घेण्यात येणार असून, निवडणुकीसाठी १० नोव्हेंबरपासून अर्ज भरता येणार आणि अखेरची मुदत १७ नोव्हेंबर असणार आहे. मतदान दिवस २ डिसेंबर असून, मतमोजणी ३ डिसेंबरला होणार आहे. या निवडणुकीत १ कोटींहून अधिक मतदार मतदान करतील. या निवडणुका इलेक्ट्रॉनिक मशीन आणि बॅलेट युनिट वापरण्यात येतील, अशी माहितीही राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे.

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात ही आचारसंहिता लागू असली तरी अन्य ठिकाणीदेखील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या मतदारांवर प्रभाव पाडणारी घोषणा किंवा कृती करता येणार नाही. आचारसंहिता लागू झाल्यामुळे शासनाला नगरपरिषदा व नगरपंचातींच्या कार्यक्षेत्राशी संबंधित धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. नैसर्गिक आपत्तीबाबत करावयाच्या उपाययोजना किंवा मदतीसंदर्भात आचारसंहितेची आडकाठी असणार नाही. आचारसंहिता आणि कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने आजच (ता. ४ नोव्हेंबर २०२५) दोन स्वतंत्र आदेश निर्गमित केले आहेत. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबररोजी सुरूवात होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर असेल. त्यानंतर १८ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची पडताळणी केली जाईल. अपिल नसलेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत २१ नोव्हेंबर अशी असेल. तर अपिल नसलेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत २५ नोव्हेंबर ही असेल. २६ नोव्हेंबर रोजी अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल. याच दिवशी त्यांना निवडणूक चिन्हांचे वाटपही केले जाईल. त्यानंतर २ डिसेंबर रोजी नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान होईल. त्यानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजे ३ डिसेंबररोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल. शासन राजपत्रात निकाल घोषित करण्याचा दिवस १० डिसेंबर असेल.
मतदारनिहाय याद्या ७ नोव्हेंबरला प्रसिद्ध केल्या जातील, सुमारे १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मशीन आणि बॅलेट युनिटचा वापर केला जाणार असून, एका नगर पंचायतीमध्ये एका प्रभागात २ जागा आहेत. उमेदवारांचे अर्ज ऑनलाइन स्वीकारले जातील. उमेदवार जास्तीत जास्त ४ प्रभागात अर्ज दाखल करू शकतो. उमेदवारी अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. जर एखाद्याने जात वैधतेसाठी अर्ज केला असेल तर पावती आवश्यक असेल. मतदान केंद्रावर दिव्यांग, गरोदर, तान्ह्या बाळांना घेऊन येणार्‍या महिला आणि ज्येष्ठांसाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार असून, वीज, पाणी, सावली आणि शौचालयाची व्यवस्था असेल. काही मतदान केंद्र गुलाबी असतील यात सर्व प्रकारचा स्टाफ महिलाच असेल. इमारतींमध्ये मोबाईल नेता येईल. पण मतदानाच्या ठिकाणी मोबाईल नेता येणार नाही. प्रत्येक उमेदवारासाठी जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक असून, मतदारांसाठी जे संकेतस्थळ दिलं आहे, त्यात सर्च फॅसिलिटी असून तिथे मतदारांना नाव आणि केंद्र शोधता येईल. मोबाईल अ‍ॅपद्वारे नाव आणि केंद्र शोधण्याची व्यवस्था असून, यात उमेदवाराविषयी माहितीही उपलब्ध असणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अर्ज स्वीकारण्यात येणार असून, त्याची प्रिंट आउट काढून निवडणूक अधिकार्‍यांना द्यावी लागेल. ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरणार असून, ईव्हीएमवरच निवडणूक होणार असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले.


  • – १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल.
    – १७ नोव्हेंबर अर्जाची शेवटची तारीख.
    – १८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज छाननी.
    – ३१ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख.
    – २ डिसेंबरला मतदान
    – ३ डिसेंबररोजी मतमोजणी

जिल्हानिहाय नगरपरिषदा व नगरपंचायती –

सोलापूर- अक्कलकोट, अकलूज, अनागर (न.पं.), बार्शी, दुधनी, करमाळा, कुडूवाडी, मैदर्गी, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर आणि सांगोला. बीड- अंबेजोगाई, बीड, धारुर, गेवराई, माजलगाव आणि परळी- वैजनाथ, छत्रपती संभाजीनगर- फुलब्री (न.पं.), गंगापूर, कन्नड, खुलताबाद, पैठण, सिल्लोड आणि वैजापूर. धाराशिव – भूम, कळंब, मुरुम, नळदुर्ग, धाराशिव, परंडा, तुळजापूर आणि उमरगा. हिंगोली- बसमतनगर, हिंगोली आणि कळमनुरी. जालना- अंबड, भोकरदन आणि परतूर, लातूर- अहमदपूर, औसा, निलंगा, रेनापूर (न.पं.) आणि उदगीर. नांदेड- बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर (न.पं.), कंधार, कुंडलवाडी, मुदखेड, मुखेड, उमरी, भोकर, किनवट आणि लोहा. परभणी- गंगाखेड, जिंतूर, मानवत, पाथरी, पूर्णा, सेलू आणि सोनपेठ. अकोला- अकोट, बाळापूर, बार्शी- टाकळी, हिवरखेडा, मूर्तिजापूर आणि तेल्हारा. अमरावती – अचलपूर, अंजनगाव सूर्जी, चांदूरबाजार, चांदूर रेल्वे, चिखलदरा, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, धारणी (न.पं.), मोर्शी, नांदगाव खंडेश्वर (न.पं.), शेंदूरजनाघाट आणि वरुड. बुलढाणा- बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, जळगाव जामोद, खामगाव, लोणार, मलकापूर, मेहकर, नांदूरा, शेंगाव आणि सिंदखेडराजा. वाशीम- कारंजा, मालेगाव (न.पं.), मंगरुळपीर, रिसोड आणि वशीम. यवतमाळ आर्णी, दारव्हा, दिग्रस, घाटंजी, पुसद, उमरखेड, वणी, यवतमाळ, ढाणकी (न.पं.), नेर- नवाबपूर आणि पांढरकवडा. भंडारा – पवनी, साकोली शेंदूरवाफा, तुमसर आणि भंडारा. चंद्रपूर- बल्लारपूर, भद्रावती, भिसी (न.पं.), ब्रह्मपूरी, चिमूर, गडचांदूर, घुग्घुस, मूल, नागभीड, राजूरा आणि वरोरा. गडचिरोली- आरमोरी, देसाईगंज आणि गडचिरोली. गोंदिया- गोंदिया, पालघर- डहाणू, जव्हार, पालघर आणि वाडा (न.पं). रायगड – अलिबाग, कर्जत, खोपोली, महाड, माथेरान, मुरुड-जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन आणि उरण (न.प.). रत्नागिरी- चिपळूण, देवरुख (न.पं.), गुहागर, खेड, लांजा (न.पं.), राजापूर आणि रत्नागिरी. सिंधुदूर्ग- कणकवली (न.पं.), मालवण, सावंतवाडी आणि वेंगुर्ला, ठाणे– अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर. अहिल्यानगर– देवळाली प्रवरा, जामखेड, कोपरगाव, नेवासा (न.पं.) (न.पं.), पाथर्डी, राहाता, राहूरी, संगमनेर, शेवगाव, शिर्डी, श्रीगोंदा आणि श्रीरामपूर. धुळे- दोंडाईचा-वरवाडे, पिंपळनेर, सिंदखेडा (न.पं.) आणि शिरपूर वरवाडे. जळगाव – जामनेर, अमळनेर, भडगाव, भुसावळ, चाळीसगाव, चोपडा, धरणगांव, एरंडोल, फैजपूर, मुक्ताईनगर (न.पं.), नशिराबाद, पाचोरा, पारोळा, रावेर, सावदा, शेंदूणी (न.पं.), वरणगाव आणि यावल. नंदूरबार – शहादा, नंदुरबार, नवापूर आणि तळोदा. नाशिक- भगुर, मनमाड, नांदगाव, सटाणा, सिन्नर, येवला, चांदवाड, इगतपूरी, ओझर, पिंपळगांव बसवंत आणि त्र्यंबक. कोल्हापूर- आजरा (न.पं.), चंदगड (न.पं.), गडहिंग्लज, हातकणंगले, हुपरी, जयसिंगपूर, कागल, कुरुंदवाड, मलकापूर, मुरगूड, पन्हाळा, शिरोळ आणि वडगाव. पुणे- आळंदी, बारामती, भोर, चाकण, दौंड, फुरसुंगी उरळी देवाची, इंदापूर, जेजूरी, जुन्नर, लोणावळा, मालेगाव बु. (न.पं.), मंचर (न.पं.), राजगुरुनगर, सासवड, शिरुर, तळेगाव- दाभाडे आणि वडगाव (न.पं.). सांगली – आष्टा, आटपाडी (न.पं.), इस्लामपूर, जत, पळूस, शिराळा (न.पं.), तासगाव आणि विटा. सातारा – कराड, महाबळेश्वर, मलकापूर, मेढा (न.पं.), म्हसवड, पाचगणी, फलटण, रहिमतपूर, सातारा आणि वाई.

Share This Article
Exit mobile version