नशिराबाद फाट्याजवळ भीषण अपघात; सिंदखेडराजातील डॉ. प्रकाश चौधरी यांचा जागीच मृत्यू; मुलगा गंभीर जखमी, जालन्यात उपचार सुरू!

admin 1 Min Read
1 Min Read

– सिंदखेडराजातील वैद्यकीय क्षेत्र हळहळले!

सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – शहरातील नामवंत वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्व डॉ. प्रकाश चौधरी यांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला आहे, तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी असून, सध्या जालना येथे त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. चौधरी व त्यांचा मुलगा हे दुचाकीवरून जात असताना नशिराबाद फाट्याजवळ उभ्या असलेल्या ट्रकला त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. धडकेचा जोर एवढा प्रचंड होता, की डॉ. चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा गंभीर जखमी झाला. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. विजय सोनुने (सिंदखेडराजा) यांनी तात्काळ ठाणेदार आशीष इंगळे यांना घटनेची माहिती दिली. स्थानिकांनी तत्काळ १०८ क्रमांकावर फोन करून शासकीय रूग्णवाहिका बोलावून जखमी मुलाला पुढील उपचारासाठी जालना येथील रुग्णालयात हलवले. सदर अपघाताची नोंद सिंदखेडराजा पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या दुर्देवी घटनेने सिंदखेडराजा शहरासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. डॉ. चौधरी हे आपल्या सुस्वभाव व सामाजिक कार्यासाठी परिचित होते. त्यांच्या अचानक जाण्याने वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

Share This Article
Exit mobile version