– खामगावात राष्ट्रवादी अजित पवार गटाला जोरदार झटका; बाजार समिती सभापती सुभाष पेसोडेंविरूद्ध अविश्वास ठराव दाखल!
– जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांच्याकडे दाखल केला प्रस्ताव,१४ नोव्हेंबरला मतदान!
– माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांना शह देण्यासाठी दादा, भाऊ, नानाची खेळी?
खामगाव/बुलढाणा (बाळू वानखेडे) – खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांचे समर्थक सुभाष पेसोडे यांच्याविरुद्ध आज, दि. ३ नोव्हेंबररोजी बाजार समितीच्या १८ पैकी १२ संचालकांनी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. या प्रस्तावावर दि.१४ नोव्हेंबररोजी विशेष सभा बोलाविण्यात आली असून, मतदान होणार आहे. या निमित्ताने नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांना दादा, भाऊ व नाना यांनी युती करत, जोरदार झटका दिल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विशेष म्हणज, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या ताब्यात खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही एकमेव संस्था आहे. तीही आता हातातून गेल्यात जमा आहे.
दरम्यान, सदर विश्वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर, वंचित बहुजन आघाडीचे नेते अशोक सोनोने व काँग्रेसचे विधानसभा नेते ज्ञानेश्वरदादा पाटील यांनी छुपी युती केल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, आता खामगाव बाजार समितीतील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग झाला असून, दि. १४ नोव्हेंबररोजी काय होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या ताब्यात असलेली खामगाव बाजार समिती ही एकमेव संस्था आता, हातातून जाणार असल्याचे बोलले जात असून, तेसुद्धा आता कोणती खेळी खेळतात याकडेदेखील धुरिणांचे लक्ष लागून आहे. विशेष म्हणजे, बाजार समितीच्या निवडणुका राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जात नाहीत.

