– बोधेगाव येथे एल्गार ओबीसी मेळावा; फडणवीस व विखे यांच्यावर घणाघाती टीका; ओबीसींना दलित–मुस्लिमांसह एकत्र येण्याचे आवाहन
अहिल्यानगर/शेवगाव (बाळासाहेब खेडकर) – ‘अरे! वाह! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही म्हणता ‘ओबीसी माझ्या डीएनएमध्ये आहेत’, मग कारखानदार विखेना मराठा आरक्षणासाठी उपसमितीचे अध्यक्ष का केले?’ असा थेट सवाल उपस्थित करत, ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार व झंझावाती टीका केली. आरक्षण आणि राजसत्ता मागून मिळत नाही, ती हिसकावून घ्यावी लागते’, असे ठणकालून सांगत प्रा. लक्ष्मण हाके यांनी ओबीसींना एकत्र येण्याचे आवाहनही याप्रसंगी केले.
बोधेगाव येथे पार पडलेल्या भव्य एल्गार ओबीसी मेळाव्यात प्रा. हाके म्हणाले, ‘आरक्षण आणि राजसत्ता, मानसन्मान हे मागून मिळत नाहीत ती हिसकावून घ्यावी लागतात. त्यासाठी ओबीसी जाती जातीने एकत्र यावे, लाख मोलाचे एक मत विकू नये आणि आपल्या माणसाला खंबीर साथ द्यावी लागेल.’ ‘आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे. ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आणि २ सप्टेंबरचा आदेश रद्द करण्यासाठी सुरू असलेला हा लढा राजकारण विरहित ठेवून पुढे न्यायला हवा. ओबीसींच्या अस्तित्व आणि सन्मानासाठी लढणार्यांना ठामपणे साथ दिली पाहिजे.’ हाके यांनी ना. विखे पाटील यांच्यावर टीका करताना म्हटले, ‘ना. विखे म्हणतात ओबीसींनी मराठा आरक्षणाला विरोध करू नये. पण मराठा समाजाने कधी ओबीसींच्या आरक्षणाला विरोध केला होता का? विखे हे बेजबाबदार, थिल्लर आणि बिनडोक बोलतात. सामाजिक न्याय खातं चालवतात पण सामाजिक न्याय काय असतो हेच त्यांना माहीत नाही. सत्तेसाठी कधी शिवसेना, कधी काँग्रेस, कधी भाजपात जाणारे विखे हे विचारशून्य लोक आहेत.’ ते पुढे म्हणाले, ‘मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात ओबीसी माझा डीएनए आहे; पण ओबीसींच्या प्रश्नावर कारखानदार विखेना उपसमिती अध्यक्ष केले! हे ओबीसी समाजाशी केलेले विश्वासघात आहे. आता विखे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहत आहेत; पण मुख्यमंत्री व्हायचे असेल तर राज्यातील दीनदलित, ओबीसी आणि अठरापगड जातींची दखल घ्यावी लागेल.’ हाके यांनी पुढे सांगितले, ‘ओबीसींची वङ्कामूठ झाली तर सत्ताधार्यांचे गणित बिघडेल म्हणूनच सर्व राजकीय पक्षांनी मराठा आरक्षणासाठी मनोज जारंगे यांना पाठिंबा दिला. महाराष्ट्रात सामाजिक न्याय देणार्यांच्या हाती सत्ता नसून घराणेशाही कारखानदारांच्या ताब्यात आहे. त्यामुळे ओबीसींनी दलित आणि मुस्लिमांसोबत एकत्र येऊन आपली ताकद दाखवली पाहिजे.’ ‘राज्यात सुमारे ६० टक्के ओबीसी असूनही त्यांना न्याय मिळत नाही. ओबीसी महामंडळांना तुटपुजी निधी दिला जातो, हे अत्यंत दुर्दैवी आहे.’, असेही प्रा. हाके म्हणालेत. या मेळाव्याचे प्रास्ताविक बोधेगावचे माजी सरपंच रामजी अंधारे यांनी केले. मेळाव्यात चंद्रकांत झारगड, राहुल आघाव, बटूळे मामा, माऊली शिरसाट, प्रदीप बांगर, नितीन शेटे, राजेंद्र दौंड, राम अंधारे, संगीता ढवळे, ?ड. अरुण जाधव, बळीराम खटके, भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप, प्रा. पी. टी. चव्हाण, अॅड. मनोज ससाणे आदी मान्यवरांची प्रभावी भाषणे झाली. मेळाव्याला भाजपा राज्य सरचिटणीस अरुण मुंडे, सुरेश आव्हाड, अविनाश सोनटक्के, संजय बनसोडे, शिवाजी खेडकर, भागवत शिंगाडे, भीमा बनसोडे, बाबा सावळकर, सुनिल पाखरे, माणिक गर्जे, भीमराव बनसोडे, अमोल सुडके, महादेव काळे, राजेंद्र बनसोडे, बाजीराव लेंडाळ, किरण पाथरकर, प्रकाश गर्जे, सिताराम भागड, राजू नरोटे, शहादेव गुंजाळ, प्रमोद वारकड, संजय गलांडे आदींसह परिसरातील ग्रामस्थांची उपस्थिती लक्षणीय होती. सूत्रसंचलन सुखदेव मर्दानी यांनी केले तर आभार केशव खेडकर यांनी मानले.