शेतकऱ्यांची औजारे चोरणारे चोरटे शेवटी पोलीसांच्या सापळ्यात!

admin 2 Min Read
2 Min Read
  • स्थानिक गुन्हे शाखेची ‘भारी’ कारवाई — ट्रॅक्टर, ट्रॉली, रोटाव्हेटरसह तब्बल ₹६.९० लाखांचा माल जप्त!
  • अंढेरा पोलीस ठाण्यातील दोन गुन्ह्यांची उकल — बुलढाणा पोलिसांचा शेतकऱ्यांना दिलासा!

बुलढाणा/सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कष्टाचे साथी असलेली औजारे चोरून नेणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या ‘धडाकेबाज’ पथकाने सापळ्यात अडकवले आहे. ट्रॅक्टर, ट्रॉली आणि रोटाव्हेटर असा तब्बल ₹६ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अंढेरा पोलीस ठाण्यातील दोन गुन्ह्यांची उकल झाली आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढत्या शेतीसंबंधी चोरीच्या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या चोरट्यांचा शोध घेऊन मुद्देमाल हस्तगत करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोनि. सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने सूक्ष्म तपास, गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषण यांच्या आधारे ३१ ऑक्टोबर रोजी जबरदस्त कारवाई करत दोन्ही चोरट्यांना पकडले. २१ सप्टेंबर २०२५ रोजी सरंबा येथील शेतकरी पवन शिवदास चेके यांची शेंदऱ्या रंगाची ट्रॉली (किंमत ₹७५,०००) रात्रीच्या सुमारास चोरून नेण्यात आली होती. त्याच गावातील विकास संपत चेके यांच्या गोठ्यातून रोटाव्हेटर (किंमत ₹६५,०००) दि. १३ जून २०२५ रोजी लंपास करण्यात आला. दोन्ही प्रकरणांची नोंद अंढेरा पोलीस ठाण्यात झाली होती. तपासादरम्यान पोलिसांनी जाफ्राबाद तालुक्यातील दोन आरोपींना पकडत दोन्ही गुन्ह्यांची यशस्वी उकल केली. गणेश आत्मारा वायाळ (वय ३८, रा. सावरखेडा, ता. जाफ्राबाद, जि. जालना), अमोल सुरेश शेवत्रे (वय ३३, रा. ब्रम्हपुरी, ता. जाफ्राबाद, जि. जालना) अशी या आरोपींची नावे असून, दोघांकडून ट्रॅक्टर : ₹५.५० लाख, ट्रॉली : ₹७५,०००, रोटाव्हेटर : ₹६५,०००, एकूण मालमत्ता ₹६.९० लाख रुपये! असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा (खामगाव) आणि अमोल गायकवाड (बुलढाणा) यांच्या देखरेखीखाली पार पडली. ही कारवाई पोनि. सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वात ASI ओमप्रकाश सावळे, पोहेकॉ. दिगंबर कपाटे, मपोहेकॉ. वनिता शिंगणे, पोकॉ. दिपक वायाळ, मनोज खरडे (स्थानिक गुन्हे शाखा) तसेच पोकॉ. कैलास ठोंबरे (तांत्रिक विश्लेषण विभाग) यांनी केली.

Share This Article
Exit mobile version