– अपर जिल्हाधिकार्यांचा निर्णय! – व्यायामशाळेवर शाळा सुरू करून शासकीय जागेवर कब्जा, चौकशीत तथ्य सिद्ध!
सिंदखेडराजा (विशेष प्रतिनिधी) – तालुक्यातील किनगावराजा ग्रामपंचायतीतील जेष्ठ महिला सदस्या सौ. प्रतिभा गणेशराव जाधव यांना शासकीय जागेवरील अतिक्रमण चांगलेच भोवले असून, अपर जिल्हाधिकार्यांनी सुनावणीअंती त्यांना अपात्र घोषित केले आहे. शासकीय जागेवरील अतिक्रमणामुळे त्यांचे ग्रामपंचायत सदस्य रद्द झाले आहे.
किनगावराजा गावातील मालमत्ता क्रमांक ९५४ वर शासनाच्या निधीतून उभारलेली व्यायामशाळा होती. युवकांसाठी बांधलेली ही इमारत प्रतिभा जाधव यांनी खासगी ‘वरद इंग्लिश स्कूल’ सुरू करून व्यापली, असा आरोप नागरीक शिवाजी काळुसे यांनी केला होता. काळुसे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर जिल्हा प्रशासनाने सुनावण्या घेत चौकशी केली आणि अखेर २८ ऑक्टोबर २०२५ रोजी अपर जिल्हाधिकार्यांनी ‘अतिक्रमण सिद्ध!’ असा ठोस निष्कर्ष देत ग्रामपंचायत सदस्य पदावरून अपात्रता जाहीर केली. या जागेवर व्यायामशाळा बांधण्यासाठी तत्कालीन आमदार निधीमधून अनुदान मिळाले होते. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने ही शासकीय मालमत्ता ग्रामपंचायतीकडे सुपूर्द केली होती. मात्र युवकांना व्यायामासाठी उपलब्ध असलेली ही जागा शाळेच्या वर्गखोलीत रूपांतरित झाल्याचे तपासात स्पष्ट झाले. विस्तार अधिकारी, सिंदखेडराजा यांनी दिलेल्या अहवालात नमूद आहे की, ग्रामपंचायतीच्या मालकीची व्यायामशाळा खासगी वापरासाठी वळविणे हे नियमभंग असून, ग्रामपंचायतीने सदर इमारत ताब्यात घेऊन युवकांसाठी खुली करावी!’ त्यानंतर सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी जाधव यांना अतिक्रमण हटविण्याची नोटीस दिली होती. मात्र त्यांनी कोणतेही मालकी हक्काचे पुरावे सादर न केल्याने अपर जिल्हाधिकार्यांनी ‘अतिक्रमणासाठी थेट जबाबदार’ असा ठपका ठेवत त्यांना अपात्र ठरवले. या निर्णयामुळे किनगावराजा ग्रामपंचायतीत मोठी खळबळ उडाली आहे. गावात चर्चा रंगली असून, ‘शासकीय निधीतून बांधलेली युवकांची व्यायामशाळा खासगी शाळेच्या ताब्यात गेली, ही तर लोकशाहीवरील गदा आहे!’ अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.