बुलढाणा (राजेश लोखंडे) – क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा आणि जिल्हा क्रीडा परिषद बुलढाणा तसेच जिल्हा तलवारबाजी असोसिएशन यांच्यावतीने घेण्यात आलेल्या अमरावती विभागीय तलवारबाजी क्रीडा स्पर्धा नुकत्याच क्रीडा संकुल बुलढाणा येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये शिवाजी हायस्कूल डोणगाव ता. मेहकर, जि. बुलढाणाचा विद्यार्थी आणि खेळाडू चैतन्य वसंतराव चगदाळे (१७ वर्ष वयोगट) याने विभागीय तलवारबाजी स्पर्धेत तलवारबाजी खेळातील फॉइल व ईपी या प्रकारात खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केल्याने चैतन्यची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
ही राज्यस्तरीय स्पर्धा दि. १२ ते १४ नोव्हेंबर २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर विभागीय क्रीडा संकुल गारखेडा परिसर या ठिकाणी संपन्न होत आहे. चैतन्य चगदाळे याचे जिल्हा क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानकर, सहाय्यक क्रीडा अधिकारी अनुराधा सोळंकी बुलढाणा, श्री. शिवाजी हायस्कूल डोणगावचे प्राचार्य, शिक्षक, जिल्हा तलवारबाजी असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराजे जाधव, सचिव शेषनारायण लोढे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त खेलो इंडियाचे प्रशिक्षक अक्षय गोलांडे, दर्शन बोर्डे, शुभम सुरडकर यांनी अभिनंदन केले. या यशाचे चैतन्यने श्रेय शेषनारायण लोढे, क्रीडा प्रशिक्षक नितीन जेऊघाले सर, अक्षय गोलांडे, दर्शन बोर्डे, किरण आखाडे सर आणि आई वडिल यांना दिले आहे.

