– बच्चू कडू, रविकांत तुपकरांसह शेतकरी नेत्यांवर सोशल मीडियातून टीकेचा आगडोंब उसळला!
– मनोज जरांगे संतापले – सरकारने शेतकर्यांची फसवणूक केली, ३० जूनपर्यंत शेतकरी मरेल, त्याचे काय?
मुंबई (प्रतिनिधी) – शेतकरी कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी तब्बल तीन दिवस जोरदार आंदोलन करणार्या माजी मंत्री बच्चू कडू यांच्यासह राजू शेट्टी, रविकांत तुपकर, कॉ. अजित नवले यांच्या शेतकरी आंदोलनाला राज्यातील महायुतीच्या सरकारने पद्धतशीरपणे गुंडाळले आहे. सह्याद्री अतिथीगृहावर काल झालेल्या बैठकीत ३० जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, या आश्वासनावर बोळवण करत, सरकारने हे आंदोलन संपविले. शेतकरी कर्जमाफीची पद्धत ठरविण्यासाठी सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून, ही समिती एप्रिल २०२६ पर्यंत आपला अहवाल सरकारला सादर करेल. त्यानंतर समितीच्या अहवालानुसार, सरकार कर्जमाफी करेल, असे या बैठकीत ठरले. सरकारच्या या निर्णयावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला असून, बच्चू कडू यांनी मात्र समाधान व्यक्त केले आहे. दुसरीकडे, राजू शेट्टी, रविकांत तुपकर व कॉ. अजित नवले या शेतकरी नेत्यांची मात्र चांगलीच गोची झाली असून, या नेत्यांविरोधात सोशल मीडियावर टीकेचा आगडोंब उसळल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, केवळ आश्वासनावर आंदोलन गुंडाळण्यात आल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला. पुण्यात बोलताना ते म्हणाले, की शेतकर्यांची आजची परिस्थिती भयानक आहे. त्यामुळे सरकारने तातडीने कर्जमाफीचा निर्णय घ्यायला पाहिजेत. मात्र सरकारने फसवणूक केली असून, ३० जूनला कर्जमाफी देणार म्हटले, पण तोवर शेतकरी मरेल, त्याचं काय, सरकारचे हे आश्वासन विश्वास ठेवण्यासारखे नाही, अशी टीकाही जरांगे पाटील यांनी केली आहे. राज्य सरकार सूडभावनेने वागत आहे. सद्या राज्यात सरसकट कर्जमुक्तीची गरज आहे. समित्या काही कामाच्या नाहीत. समिती बरखास्त करून निर्णय घ्या, नाही तर रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारादेखील जरांगे पाटील यांनी दिला आहे.
माजी मंत्री व माजी आमदार बच्चू कडू यांचे आंदोलनच संशयाच्या भोवर्यात सापडले आहे. हे आंदोलन सरकारपुरस्कृत असावे, असा संशय निर्माण झाला आहे. राष्ट्रीय शेतकरी नेते राकेशसिंह टिकैत यांनी मागील काही महिन्यांत शेतकरीप्रश्नी महाराष्ट्राचा दौरा केला होता. या दौर्यात शेतकरी नेते प्रकाश पोहरे, रविकांत तुपकर यांच्यासह बहुतांश शेतकरी नेते एकवटले होते. याच दौर्यात शेतकरी कर्जमाफीसह शेतकर्यांच्या विविध प्रश्नी आंदोलनाची व्यापक रणनीती तयार झाली होती. हे आंदोलन देशभर पेटेल, अशी भीती केंद्र व राज्य सरकारच्या मनात निर्माण झाली होती. त्यानंतर अचानक बच्चू कडू हे नेतृत्व शेतकरी आंदोलनासाठी पुढे आले. त्यात राजू शेट्टी, रविकांत तुपकर, कॉ. अजित नवले यांनादेखील आपसुक ओढले गेले. आणि, विदर्भात आंदोलनाची धग पेटवत नागपुरात गेली तीन दिवस व्यापक असे आंदोलन झाले. पेटलेले हे आंदोलन मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर बंददार चर्चेतून आश्चर्यकारकरित्या गुंडाळले गेले आहे. त्यामुळे राजू शेट्टी, रविकांत तुपकर व बच्चू कडू यांच्या हेतूविषयी संशयाचा सूर उमटू लागला असून, हे सर्व नेते सरकारला मॅनेज झालेत का? अशी चर्चा शेतकरीवर्ग करत आहेत. या आंदोलनातून आश्वासनाव्यतिरिक्त शेतकर्यांच्या पदरात काहीही पडले नसून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन लबाडा घरचे आवतण असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकरी सोशल मीडियावर व्यक्त करताना दिसत आहेत.

