भरधाव ट्रॅव्हल्सची धडक; एक जण ठार, प्रवासी जखमी

admin 1 Min Read
1 Min Read

– लोणार – लोणी रोडवरील भीषण अपघात; जखमींवर उपचार सुरू!

लोणार (वाजेद खान) – भरधाव असलेल्या मिनी ट्रॅव्हल्स बसने युवकास जोरदार धडक दिल्याने या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, बसमधील काही प्रवासी जखमी झाले आहेत. ही भरधाव बस एका ट्रकला पाठीमागून धडकल्याचे सांगण्यात येते. या अपघातातील जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू असून, लोणार पोलिसांनी वाहन चालकाविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. रमेश काळूराम मरमट (वय ३१) रा. मारूती मंदिराजवळ सोनपवाडी, सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर असे मृतकाचे नाव आहे.

लोणार ते लोणी रोडवरील जांबूल ते देऊळगाव वायसा गावाच्या दरम्यान दि. २९ ऑक्टोबररोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. मिनी ट्रॅव्हल्स बस (क्रमांक एमएच ३९ डी ०८०२) चा चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव चालवून रमेश मरमट यास जोराची धडक दिली. या धडकेत हा युवक गंभीर जखमी झाल्याने त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी चेतन प्रमोद चौधरी यांच्या फिर्यादीवरून चालकाविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, अपघातानंतर संबंधित चालक हा पळून गेला होता. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या अपघाताचा पुढील तपास पोलिस नाईक गजानन सानप हे करत असून, मिनी लक्झरी बसमधील जखमी प्रवाशांवर वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत.

Share This Article
Exit mobile version