आंदोलनामुळे नागपुरात अभूतपूर्व स्थिती; सरकारकडून बच्चूभाऊंना चर्चेचे निमंत्रण!

admin 5 Min Read
5 Min Read

– बच्चू कडूंनी चर्चेचा प्रस्ताव फेटाळला; बैठक नव्हे, थेट निर्णय घ्या!
– शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर सकारात्मक; फडणवीसांनी दिले कर्जमाफीचे संकेत!
– नागपुरात शेतकरी नेत्यांची वङ्कामूठ; राजू शेट्टी, कॉ. नवले, रविकांत तुपकर एकवटले!

नागपूर/पुणे (बाळू वानखेडे) – शेतकरी कर्जमाफीच्या प्रमुख मागणीसाठी माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला ट्रॅक्टर मोर्चा आज दुसर्‍या दिवशी नागपूर-हैदराबाद महामार्गावर पोहोचला. या आंदोलनामुळे मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंदोलकांना चर्चेसाठी निमंत्रण दिले असून, ‘सरकार चर्चा करण्यास तयार आहे, पण आंदोलकांनी बैठकीला यावं,’ असे त्यांनी स्पष्ट केले. सरकारने आधीच कर्जमाफीसाठी समिती नेमली असून, त्या समितीचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले. दरम्यान, बच्चू कडू यांनी सरकारच्या चर्चेच्या प्रस्तावाला नकार देत, ‘बैठक नव्हे, थेट निर्णय घ्या,’ अशी ठाम भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील पुण्यात बोलताना बच्चू कडू यांनी सरकारसोबत चर्चेला यावे, असे आवाहन केले आहे. यवतमाळ- नागपूर, चंद्रपूर महामार्ग ठप्प पडले असून, मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पंकज भोयर, आशीष जयस्वाल हे दोन मंत्री आंदोलनकर्त्यांची दुपारी चार वाजता भेट घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती आहे.

दुसरीकडे, शेतकर्‍यांच्या कर्जमाफीबाबत बच्चू कडू यांनी हजारो शेतकर्‍यांना घेऊन आंदोलन केले आहे. त्यांनी रास्ता रोकोसोबतच रेल रोको करणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू यांना चर्चेला येण्याचे आवाहन केले आहे. लोकांना त्रास होईल असे काही करू नये, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. फडणवीस म्हणाले, आंदोलनाच्या आधीदेखील आम्ही बैठक बोलवली होती. आपण चर्चा करून यातन ज्या गोष्टी शक्य आहेत त्या करू अशा प्रकारे आम्ही सांगितले होते. पहिल्यांदा बच्चू कडूंनी त्याला मान्यताही दिली होती. त्यानंतर त्यांनी अर्ध्या रात्री मला संदेश पाठवला की लोक जमा होतील आम्ही असणार नाही. याच्यामुळे अडचण होऊ शकते, त्यामुळे आम्ही काही बैठकीला येऊ शकणार नाही. त्यामुळे मग आम्ही ती बैठक रद्द केली. आजही बावनकुळे साहेबांनी त्यांच्याशी संपर्क केलेला आहे. शेवटी त्यांनी इतके वेगवेगळे प्रश्न मांडलेले आहेत. ते प्रश्न असे नुसते आंदोलनाच्या माध्यमातन त्या ठिकाणी सोडवू शकू अशी परिस्थिती नाही. कुठल्याही परिस्थितीत हे रेल रोको आणि बाकी गोष्टी या मात्र करणं योग्य नाही. त्या करू दिल्या जाणारही नाहीत. त्यामुळे आमचं स्पष्ट आव्हान आहे की, शेतकर्‍यांच्या प्रश्नावर आम्ही सकारात्मक आहोत. या सरकारने ३२ हजार कोटी रुपयांचा पॅकेज दिलय. पैसे शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये आम्ही देतो आहोत. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या चर्चेची सरकारची तयारी आहे, चर्चा करावी आणि त्यातन मार्ग काढावा, असेही फडणवीस यांनी सांगितले.


  • कालची रात्र बच्चू कडू आणि आंदोलकांनी जामठा येथे महामार्गावर काढली होती. कालच्या तुलनेत गर्दी कमी झाली असली तरी शेकडो ट्रॅक्टर आणि वाहनांसह आंदोलक हे महामार्ग रोखून बसले आहेत. आज १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम बच्चू कडू यांनी दिला होता. त्यानंतर रेल्वे रोकोचा इशारा दिला होता. परंतु, सरकारने चर्चेसाठी निमंत्रण दिल्यानंतर रेल्वे रोके आंदोलन थांबवले होते. बच्चू कडू यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी, वामनराव चटप, माजी मंत्री महादेव जानकर हेदेखील नागपूर येथे आंदोलनस्थळी शेतर्‍यांच्यासोबत रात्रभर रस्त्यावरच झोपले होते.
  • दुसरीकडे वर्धा, चंद्रपूर, हैदराबाद, अमरावती, जबलपूर महामार्गावर हजारो वाहने खोळंबल्याने या मार्गावरील प्रवासी, सामान्य नागरिक, विद्यार्थ्यांनादेखील मोठा फटका बसला. काही महाविद्यालयांनीदेखील आज सुट्टी जाहीर केली आहे. वर्धा रोडवर गवसी मानापूर परिसरात बच्चू कडू यांचे हे ठिय्या आंदोलन सुरू आहे. कर्जमुक्ती, दिव्यांगाना सहा हजार महिना आदी इतर मागण्यांवर निर्णय न झाल्यास रेल्वे रोको प्रसंगी नागपूर विमानतळाचा रस्ता देखील आम्ही रोखून धरू असा इशारा देण्यात आला आहे. एकंदरीत हे आंदोलन आज सरकारने चर्चा न केल्यास अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

‘महाराष्ट्रातील आम्ही सर्व शेतकरी नेते एकत्र आहोत. ही एक अभूतपूर्व गोष्ट या ठिकाणी घडताना दिसत आहे. आम्ही वेगवेगळ्या भागात लढतो. पण शेतकर्‍यांची वङ्कामूठ एका ठिकाणी आणण्याचं काम बच्चू कडू यांनी केलं आहे. हा मोर्चा अशा ठिकाणी आणला आहे की, समृद्धी महामार्ग बंद, हैदराबाद-जबलपूर मार्ग बंद सगळे रस्ते बंद केले आहेत. बच्चू कडू यांनी फार सर्वेक्षण केलेलं आहे. कारण इथून एकही गाडी पास होणार नाही. सरकारचं नाक दाबल्याशिवाय सरकारचं तोंड उघडत नाही’.
पोलिसांच्या बंदुकीच्या गोळ्या कमी पडतील पण नागपूरमध्ये आमच्या छात्या कमी पडणार नाहीत हे लक्षात ठेवा. आम्ही मरायला आलो आहोत. आम्ही असे मरणार नाहीत. तुमच्यासारखे पाच-दहा घेऊन गेल्याशिवाय राहणार नाहीत. आता इथून पुढे आत्महत्या करायची नाही. कितीही संकट आलं तरी मरायचं नाही. जसं बच्चू भाऊंनी सांगितलं की, दोन-चार आमदारांना कापा. तसं मी सांगतो की, दोन-चार मंत्र्यांना कापा. पण आता मागे हटायचं नाही’,
– रविकांत तुपकर, शेतकरी नेते

Share This Article
Exit mobile version