– बळीराजा स्मृती समारंभात मार्गदर्शन; ‘कृषीयोध्दा’ युवकांचा सन्मान!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – आजचा दिवस बळी प्रतिपदा म्हणून साजरा केला जातो. बळीराजा याबद्दल समाजात फारशी माहिती नाही. पण जो जगाचा पोशिंदा आहे त्याला बळीराजा म्हटले जाते. घराचा कर्ता चांगला असला तर घरपण दिसते, गावाचा कर्ता चांगला असला तर गाव चांगलं राहतं, राज्याचा कर्ता चांगला असला तर राज्य चांगलं राहतं आणि देशाचा कर्ता चांगला असला तर देश चांगला राहतो. जसा राजा तथा प्रजा अशी परिस्थिती आहे. असे प्रबोधन हभप. सोपान महाराज शास्त्री यांनी बळीराजा स्मृती समारंभात केले. यावेळी सुप्रसिद्ध शेतीविषयक वेबसाइट्स चालविणारे ज्ञानेश्वर खरात पाटील, युवा संघर्ष समितीचे अध्यक्ष कैलास मेहेत्रे, शेतकरी योध्दा विनायक भानुसे, शेतकरी योध्दा गजानन चव्हाण, उध्दव काकडे, बालाजी सोसे यांचा महाराज शास्त्री सानप यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी भाजपाचे पक्ष प्रवक्ते विनोद वाघ, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अशोक नाना जाधव, सरकटे महाराज व्यासपीठावर उपस्थित होते.
मी प्रथम शेतकर्यांचा प्रवक्ता मग पक्षाचा – विनोद वाघ
या जगाचा पोशिंदा हा शेतकरी आहे. त्यांच्या समस्या मांडताना पक्ष बाजूला सारून त्यांच्या न्याय हक्कासाठी मी कधीही रस्त्यावर यायला तयार आहे. प्रथम शेतकरी जगला पाहिजे, तरच आपण जगू. त्यासाठी मी अनेक वेळा आंदोलन केली आहेत. त्यामुळे मी प्रथम शेतकर्यांचा प्रवक्ता आहे नंतर पक्षाचा, असे उद्गार भाजपचे प्रदेश पक्ष प्रवक्ते विनोद वाघ यांनी काढले. लोकजागर परिवाराचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण गिते यांनी आपल्या प्रास्ताविकात शेतकरी जगला पाहिजे, त्यासाठी शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी जे आंदोलनकर्ते आहेत त्यांचा आज बळीराजा स्मृती प्रित्यर्थ सन्मान केला पाहिजे, हा हेतू लोकजागर परिवाराचा आहे. यानंतर माझी पुढील दिशा हा राजकीय असल्याचे त्यांनी सांगितले.

