– दिवाळी भेटीगाठीतून विष्णूमामा घुबे यांची साखरपेरणी; मिसाळवाडी, शेळगाव आटोळ, इसरूळमध्ये प्रतिसाद – पक्षभेद विसरून डॉ. शिंगणे गटाच्या नेत्यांनीही केले विष्णूमामांचे स्वागत! – डॉ. विकास मिसाळ व विष्णू घुबे पाटील यांच्यात सरळसरळ लढतीचे संकेत! – मिसाळवाडीतून उमेदवार देण्याचा ग्रामस्थांचा संकल्प!
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राजकीय मोर्चेबांधणी जोरात सुरू असून, अनेक इच्छूक कामाला लागले आहेत. भारतीय जनता पक्षाचे तालुका उपाध्यक्ष व आ. श्वेताताई महाले पाटील यांचे निकटवर्तीय विष्णूमामा घुबे पाटील यांनी दीपावली सणाचे औचित्य साधून गटातील गावांत भेट दौरे केले व ग्रामस्थांचा प्रतिसाद जाणून घेतला. या गावभेट दौर्यांना चांगला प्रतिसाद लाभला असून, विशेष म्हणजे मिसाळवाडी, शेळगाव आटोळ, इसरूळ येथे त्यांचे राजकीय विरोधक असलेल्या डॉ. राजेंद्र शिंगणे गटाच्या स्थानिक नेत्यांनी त्यांना चहा-फराळाला बोलावून सर्वांना सुखद धक्का दिला. मिसाळवाडीत सरपंच बाळू पाटील, शेळगाव आटोळमध्ये डॉ. विकास मिसाळ, तर इसरूळमध्ये सरपंच सतिश पाटील भुतेकर यांनीदेखील विष्णूमामा घुबे यांना चहापानाला बोलावून राजकारण राजकारणाच्या ठिकाणी तर वैयक्तिक संबंधदेखील जोपासणे महत्वाचे असल्याचे अधोरेखीत केले. मिसाळवाडीत काही ग्रामस्थांनी बैठक घेऊन गावातून जिल्हा परिषदेसाठी उमेदवार देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यासाठी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे स्थानिक कार्यकर्ते सुनील मिसाळ यांच्या पत्नी कल्पना सुनील मिसाळ यांनी ही निवडणूक लढवावी, असे यावेळी निश्चित करण्यात आले.
शेळगाव आटोळ जिल्हा परिषद गटातून अनेक इच्छुकांची भाऊगर्दी झालेली आहे. भारतीय जनता पक्षाचा येथे विद्यमान सदस्य असून, ही जागा जिंकण्यासाठी यावेळेस मात्र भाजपला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. भाजपकडून ज्येष्ठ नेते तथा तालुका उपाध्यक्ष विष्णूमामा घुबे, पत्रकार कृष्णा सपकाळ हे इच्छूक आहेत. या पृष्ठभूमीवर विष्णूमामा घुबे यांनी दिवाळीत गावभेट दौरे करून ग्रामस्थांच्या सदिच्छा भेटी घेतल्या. या धावत्या भेटीत त्यांना चांगला प्रतिसाद दिसून आला. एवढेच नाही तर शेळगाव आटोळमध्ये डॉ. शिंगणे गटाकडून निवडणूक लढविण्यास सज्ज झालेले डॉ. विकास मिसाळ यांनीदेखील त्यांना चहा-फराळाचे निमंत्रण देत, वैयक्तीक मैत्री व राजकीय संघर्ष वेगवेगळा असल्याचे कृतीतून दाखवून दिले. एवढेच नाही तर मिसाळवाडीत शिंगणे गटाचे सरपंच बाळू पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक तथा आ. श्वेताताई महाले पाटील यांचे पती विद्याधर महाले पाटील यांचे निकटवर्तीय उपसरपंच हनुमान मिसाळ यांनीदेखील विष्णूमामा घुबे यांचे स्वागत केले. गावकर्यांनीदेखील त्यांच्या दौर्याला चांगला प्रतिसाद दिला. इसरूळमध्ये तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा सरपंच सतिश पाटील भुतेकर यांनीदेखील चहा-फराळाला निमंत्रित करून त्यांचे स्वागत केले, व गावकर्यांनीही त्यांचे चांगले स्वागत केले. यासह पिंपळवाडी, देऊळगाव घुबे, येवता, बेराळा, मुरादपूर, मंगरूळ येथेदेखील त्यांनी भेटीगाठी घेऊन साखरपेरणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस (शिंगणे गट) यांच्याकडून डॉ. विकास मिसाळ हे प्रबळ दावेदार असून, या गटात डॉ. राजेंद्र शिंगणे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. इसरूळ, शेळगाव आटोळ, मिसाळवाडी, देऊळगाव घुबे, अमोना या गावांत त्यांचे वर्चस्व असून, ग्रामपंचायतीदेखील ताब्यात आहेत. त्यामुळे डॉ. शिंगणे हे कोणता उमेदवार देतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहेत.
दरम्यान, मिसाळवाडी गावातून क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे स्थानिक कार्यकर्ते सुनील मिसाळ यांच्या पत्नी सौ. कल्पना सुनील मिसाळ यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवावी, यासाठी गावातील ग्रामस्थांनी बैठक घेत, त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. विशेष म्हणजे, गावातील दोन विरोधी गट यावेळी एकत्र आल्याचे दिसून आले. डॉ. राजेंद्र शिंगणे गटाचे सरपंच बाळू पाटील व आ. श्वेताताई महाले गटाचे उपसरपंच हनुमान मिसाळ या दोघा विरोधकांचीदेखील या बैठकीला उपस्थिती होती. तसेही, या गावात प्रचंड एकोपा असून, राजकीय वैर विसरून हे गाव एखाद्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहू शकते. त्यामुळे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासाठी या गावातून मताधिक्य घेण्याचे मोठे आव्हान उभे राहणार आहे. त्यांचे कट्टर समर्थक असलेले सरपंच बाळू पाटील हे विष्णूमामा घुबे यांच्यासोबतही नुकतेच दिसून आले होते, आता सुनील मिसाळ यांच्यासाठीही ते मैदानात उतरल्याचे दिसून आले आहे. या गावावर डॉ. शिंगणे यांचे वर्चस्व असून, याशिवाय विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या गावातील सुपुत्रांच्या सूचनेनुसार गावकरी आपली राजकीय भूमिका घेत असतात. त्यामुळे तूर्ततरी सुनील मिसाळ यांना गावाचा पाठिंबा असल्याचे दिसून येत आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मात्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत अद्याप तरी आपली भूमिका जाहीर केलेली नाही. या गटात ते उमेदवार देतील की नाही, याबाबत शाश्वती नसल्याचे सांगण्यात येत आहे.