सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील किनगावराजा पोलिस ठाण्याच्या पथकाने आज (दि.२२) सकाळी पांग्री-उगले रोड परिसरात कारवाई करत, एका इसमाला गोवंश कत्तल व मांस विक्रीप्रकरणी रंगेहात पकडले. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २२,८५० किमतीचे गोमांस व मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सकाळी सुमारे १०.१५ वाजता करण्यात आली.
पोलीस कॉन्स्टेबल शरद दत्तू म्हस्के (वय ३३, रा. किनगाव राजा) यांनी दिलेल्या लेखी फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक २६०/२०२५ दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील आरोपी सैय्यद हमजा सैय्यद चाँद (वय ४२, रा. काळाकोट, ता. सिंदखेडराजा) हा गोवंशाचे कत्तल करून त्याचे मांस विक्रीसाठी मोटारसायकलवरून घेऊन जात असताना पोलिसांच्या हाती सापडला. फिर्यादी पोकॉ. शरद म्हस्के यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध कलम २७१ भा.न्या.सं. सह कलम ५(क), ९(अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि कलम ३/१८१, १३०/१७७ मोटार वाहन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोहेका अनिल नागरे (ब. क्र. १६१, पोलीस स्टेशन किनगाव राजा) यांच्या स्वाधीन असून, त्यांनी प्राथमिक चौकशीस सुरुवात केली आहे. कारवाई ठाणेदार संजय मातोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, किनगावराजा पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.