बिबी पोलिसांनी देशाकट्ट्यासह पकडला ‘यूपी’चा कुख्यात गुन्हेगार!

admin 3 Min Read
3 Min Read

– समृद्धी महामार्गावरील धडक कारवाई; देशी बनावटीची पिस्टल, चार जीवंत काडतुसेही हस्तगत!

बिबी (ऋषी दंदाले) – उत्तर प्रदेशातील दरोडा, लूटपाट, गँगवार यासह अनेक गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगारास बिबी पोलिसांच्या पथकाने सतर्कतेने जेरबंद केले असून, त्याच्याकडून गावठी कट्ट्यासह चार जीवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहे. समृद्धी महामार्गावर ही थरारक कारवाई करण्यात आली असून, आरोपीला सुरूवातीला पोलिस कोठडी व आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

सविस्तर असे, की समृद्धी महामार्गावर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या आदेशानुसार बुलढाणा जिल्हा हद्दीत नियमित २४ तास पेट्रोलिंग करण्यात येत असून, दिनांक १९ ऑक्टोबररोजी दुपारी बिबी पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार तसेच वाहतूक शाखा बुलढाणा येथील अंमलदार हे पेट्रोलिंग करत असताना समृद्धी महामार्गावरील नागपूर मुंबई लेनवर चॅनल क्रमांक ३०३-५ खळेगाव तालुका लोणार शिवारात एक आयशर वाहनाचा चालक हा संशयास्पदरितीने थांबला असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून बिबी पोलीस स्टेशनचा स्टाफ व वाहतूक अंमलदार हे नमूद घटनास्थळी गेले व त्या ठिकाणी उभ्या असलेल्या आयशर वाहन क्रमांक एमएच ४० सीडी ०७३५ यातील वाहन चालक यास पोलिसांनी विचारपूस केली असता, त्यांनी त्याचे नाव लपवून खोटे नाव सांगितले व त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलीस पथकाने त्याची कसून चौकशी केली असता, त्यांनी त्याचे नाव अदिल उर्फ मेराज मो मुस्तकीम रा. सोभीपूर, ता.जिल्हा प्रतापगड, राज्य उत्तर प्रदेश असल्याचे सांगितले. सदर आरोपी इसमाची अंगझडतीमध्ये त्याचे खिशात दोन जीवंत काडतुसे मिळून आली. त्यातून अधिक संशय बळवल्याने त्याच्या बॅगची तपासणी केली असता, त्यात एक सिल्वर रंगाची देशी बनवण्याची पिस्टल (देशी कट्टा) व दोन जीवंत काडतुसे मिळून आली. आरोपीकडे मिळून आलेल्या एक देशी कट्टा व एकूण चार जीवंत काडतूस तसेच मोबाईल, वाहन व रोख रक्कम ही पोलिसांनी जप्त केली असून, आरोपीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपीस अटक करण्यात आली असून, सदर आरोपी ताब्यात घेऊन अधिक चौकशी व त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची पाहणी केली असता नमूद आरोपीविरुद्ध उत्तर प्रदेश राज्यात सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे, जसे दरोडा, जबरी चोरी, फसवणूक, लूटपाट, गँग कायदा कलम, तसेच शस्त्र कायदा विस्फोटक पदार्थ बाळगण्याचे विविध गुन्हे दाखल असल्याचे समजून आले. आरोपी हा मान्धता पोलीस स्टेशन जिल्हा प्रतापगड उत्तर प्रदेश याच्या रेकॉर्डवरील हिस्ट्री सीटर गुन्हेगार असल्याची माहिती मिळवून आली आहे. असा सराईत आरोपी हा आपली ओळख लपून नागपूर येथील एका ट्रान्सपोर्ट कंपनीत चालक म्हणून कामावर लागला व हत्यारासह महाराष्ट्रात मिळून आल्याने बुलढाणा पोलिसांच्या पेट्रोलिंग व सतर्कतेमुळे अनुचित प्रकार होण्यापासून रोखले गेले आहे. आरोपीच्या दोन दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर त्याची न्यायालयीन कोठडीत कारागृहात परवानगी झाली असून, आरोपीविरुद्ध दाखल गुन्ह्याचा पुढील तपास बिबी पोलीस करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बुलढाणा नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गणेश कड, पोलीस अंमलदार अरुण सानप, रवींद्र बोरे, संदीप शिंदे, अर्जुन सांगळे, राजू आडवे, वाहतूक शाखा अमलदार शिवानंद मुंडे, श्रीकृष्ण दूनगु यांनी केली आहे.

Share This Article
Exit mobile version