– उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे यांच्या तात्काळ पुढाकारामुळे महामार्ग विभाग व पोलिसांचा संयुक्त निर्णय!
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – अखेर राहेरी बुद्रूक येथील भराव वाहून गेल्याने बंद पडलेला पूल सुरू झाला असून, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या पुढाकारामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने काम करून हा पूल सुरू केला. तसेच, जिल्हाधिकारी व परिवहन विभाग यांनाही पत्र देऊन जड वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे, या पुलाबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने सुरूवातीपासून जोरदार पाठपुरावा सुरू ठेवला होता.
सविस्तर असे, की जालना–सिंदखेडराजा–मेहकर–कारंजा–पुलगाव या राष्ट्रीय महामार्ग क्र. ०५३ क वरील राहेरी बुद्रूक गावाजवळील पूल दि. २८ सप्टेंबररोजी खडकपूर्णा धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे धोकादायक स्थितीत आला होता. पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे नव्या पुलाचा दोन्ही बाजूंचा कच्चा भराव वाहून गेला, परिणामी मार्गावरील जड वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेची सर्वप्रथम माहिती ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने प्रसारित केली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी तात्काळ घटनास्थळी पाहणी करून नव्या पुलाच्या कच्चा भरावाच्या तातडीच्या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाला आदेश दिले. खडसे यांच्या सूचनांनुसार राष्ट्रीय महामार्ग विभागाने महसूल विभागाची परवानगी घेऊन मुरूम टाकून पुल व वळण रस्ता व्यवस्थित केला. काही दिवसांच्या मेहनतीनंतर हा मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग, अमरावतीचे कार्यकारी अभियंता यांनी दि. १० ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना पत्राद्वारे राहेरी बुद्रूक पुलावरून जड वाहन वाहतूक सुरू करण्यास मंजुरी दिली. यानंतर पोलिस स्टेशन किनगावराजा येथील सहाय्यक पोलिस निरीक्षकांनी दि.१२ ऑक्टोबररोजी आगार प्रमुख, मेहकर यांना पत्राद्वारे कळविले की, राहेरी गावातून जाणार्या नव्या पुलावरून जड वाहनांची वाहतूक वळविली जावी. सदर दुरुस्ती झाल्यानंतर आता जड वाहनांची वाहतूक व बसेस पुन्हा मार्गी होणार आहेत, अशी माहिती मेहकर डेपोचे चालक अनंता मुंढे यांनी दिली. या निर्णयामुळे सिंदखेडराजा, मेहकर व कारंजा परिसरातील नागरिक, प्रवासी आणि वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
————
याबद्दल राहेरी येथील सरपंचपती बालाजी देशमुख यांनी असा आरोप केला आहे की, थातूरमातूर काम करून गावकर्यांची दिशाभूल होत असून, हा सर्व रोड मुरमाचा आहे का डांबरी आहे हे सर्वसामान्य माणसाला ओळखणे अशक्य आहे. सर्व रोडवर मोठाले गोटे टाकून, एखांदा दगड उडून लागण्याची शक्यता आहे, जर बर वाईट झाल्यास डिपार्टमेंट जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

