– अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांतील १८४ वस्त्यांमधील कामांसाठी १८ कोटी मंजूर!
– बुलढाणा जिल्हा टॉपवर; ६४ कामांसाठी ८ कोटींचा निधी!
– मेहकर तालुक्यातील १० वस्त्या लखलखणार; सोलार हायमस्टसाठी एक कोटी!
बुलढाणा/अमरावती (बाळू वानखेडे) – वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेतून वस्त्यांचा कायापालट होणार आहे. या अंतर्गत अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील १८४ कामांसाठी १८ कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये बुलढाणा जिल्हा टॉपर असून, ६४ कामांसाठी ८ कोटी रुपये मंजूर झाले आहेत, तर मेहकर तालुक्यातील १० वस्त्यांमध्ये सोलर हायमस्टला मंजुरी मिळाल्याने सदर वस्त्या लखलखणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय १० ऑक्टोबररोजी इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे उपसचिव र.रा.पेठकर यांनी जारी केला आहे.
वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत अमरावती विभागातील अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ व अमरावती जिल्ह्यातील १८४ वस्त्यांमध्ये वेगवेगळ्या कामांसाठी राज्य शासनाच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागाकडून १८ कोटी १० लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असून, यातील ९ कोटी रुपये निधी वितरणास सुद्धा मंजुरी देण्यात आली आहे. सदर कामांमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील कामे सर्वात जास्त मंजूर झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये ६४ कामांसाठी ८ कोटी इतका निधी मंजूर झाला आहे, तर बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील दहा वस्त्यांमध्ये सोलार हायमस्ट साठी १ कोटी रूपये मंजूर झाल्याने या वस्त्या लखलखणार आहेत. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील मंजूर मेहकर तालुक्यातील पाथर्डी बंजारा वस्ती, ऊटी जगदंबा नगर व वसंतराव नाईक नगर, देऊळगाव साकरशा येथील वसंतराव नाईक नगर व सेवालाल नगर, विठ्ठलवाडी येथील सेवालाल नगर, वसंतराव नाईक नगर व शामकी माता नगर, नायगाव देशमुख येथील वसंत नगर व वरुड येथील सेवालाल नगर येथे प्रतिवस्ती १० लक्ष रुपये याप्रमाणे सोलार हायमस्टसाठी मंजूर झाले आहेत. लोणार तालुक्यातील नांद्रा येथील भगवानबाबा नगर येथे सोलार हायमस्टसाठी १० लक्ष मंजूर झाले आहेत. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील मंजूर वस्तीनिहाय कामे व मंजूर निधी याबाबतची यादी सोबत जोडली आहे –

