– साखरखेर्डा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; बांधकामासाठी कामगार आलेल्यांनीच फोडले घर!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – येथील चार बांधकाम मजूर पिंपळगाव सोनारा येथे बांधकाम करण्यासाठी गेले असता घरात कोणीच नाही ही संधी साधून घरातील नगदी रोख रक्कमेसह २ लाख ५० हजारांचा ऐवज लंपास केला होता. परंतु, साखरखेर्डा पोलिसांनी या घरफोडीचा शिताफीने तपास करत, तत्काळ संशयित आरोपीस अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे.
साखरखेर्डा येथील शेख अक्रम शेख उर्फ गणेश जगताप, शेख तौफिक, शेख मुजावर आणि परवेज खान हे चौघे पिंपळगाव सोनारा येथे बांधकाम करण्यासाठी गेले होते. ८ ऑक्टोबररोजी कैलास त्र्यंबक ठोसरे हे कामाची लिंक लाऊन शेतात सोयाबीन सोंगण्यासाठी पत्नीसह गेले होते. सायंकाळी घरी परत आले असता घराच्या मागच्या बाजूच्या दरवाजाची कडी, कोंडा तोडलेला आढळून आला. तसेच पॅटच्या खिशातील ३९ हजार रुपये, कपाटातील अडीच तोळे सोन्याचे दागिने चांदीचे दागिने नसल्याचे आढळून आले. त्यांना बांधकाम करणार्या कामगारांवर संशय आला. त्यांनी तत्काळ साखरखेर्डा पोलीस स्टेशनमध्ये नाव घेऊन वरील चारही व्यक्तींवर आपल्या तक्रारीत संशय व्यक्त केला. ठाणेदार गजानन करेवाड यांनी रात्रीच दोन पथके तयार करून चारही व्यक्तींना पोलिस स्टेशनमध्ये हजर करून पोलीस खाक्या दाखविताच शेख अक्रम उर्फ गणेश जगताप याने चोरीची कबुली दिली. शेख अक्रम उर्फ गणेश जगताप यांचे काही दिवसांपूर्वी लग्न होणार होते. त्यासाठी त्याने चोरी केल्याचे कबूल केले. जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गजानन करेवाड यांनी आरोपी शेख अक्रम उर्फ गणेश जगताप वय २४ वर्ष याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ नुसार कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) नुसार अटक केली आहे. सिंदखेडराजा न्यायालयात हजर केले असता दोन दिवासाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
————