अतिवृष्टीच्या विशेष मदत पॅकेजमधून जिल्ह्यातील चार तालुक्यांना ठेंगा; प्रतापराव जाधव, संजय कुटेंचे तालुके वगळले!

admin 5 Min Read
5 Min Read

– मेहकर, लोणार तालुक्यांत यावर्षी बरसला १०० मिलीमीटरच्यावर पाऊस; लाखो एकरावरील पिके उद्ध्वस्त; केंद्रीय मंत्र्यांच्याच तालुक्यांना शासनाने दाखविला ठेंगा!
– मेहकर, लोणार तालुक्यांचा विशेष पॅकेजमध्ये समावेश करणारच – आमदार सिद्धार्थ खरात

बुलढाणा (बाळू वानखेडे) – राज्यात जून ते सप्टेंबर २०२५ या दरम्यान अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवा, दि. ७ ऑक्टोबररोजी ३१ हजार कोटीच्यावर रकमेचे विशेष मदत पॅकेज जाहीर केले. त्यामुळे शेतकर्‍यांना काहीसे हायसे वाटले. आता याबाबत आज, दि.९ ऑक्टोबररोजी शासन निर्णय जारी झाला असून, या विशेष मदत पॅकेजमधून जिल्ह्यातील मेहकर, लोणार, संग्रामपूर व जळगाव जामोद या चार तालुक्यांना वगळण्यात आले आहे. विशेष म्हणजे, जून महिन्यात मेहकर व लोणार तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस होऊन या दोन तालुक्यांत लाखाच्यावर एकरावरील पिके नेस्तनाबूत झाली होती. जमीनही मोठ्या प्रमाणात खरडून गेली होती. तर शासकीय मालमत्तेचेसुध्दा मोठे नुकसान झाले होते. इतके नुकसान होवूनही सदर पॅकेजचा फायदा होणार नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे, वगळण्यात आलेले तालुके केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे असून, त्यांनी सप्टेंबरमधील अतिवृष्टीची पाहणी करून शेतकर्‍यांना सरकारकडून भरघोस आर्थिक मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली होती. परंतु, सरकारने त्यांना चांगलाच झटका दिला असल्याचे दिसून येत आहे. तर तालुक्यांचा सदर पॅकेजमध्ये समावेश करणारच अशी ठाम ग्वाही आमदार सिद्धार्थ खरात यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना दिली.

.शासनाचा जीआर वाचण्यासाठी येथे क्लीक करा..

जून ते सप्टेंबर २०२५ दरम्यान राज्यात अतिवृष्टी तसेच महापुराने धुमाकूळ घातला. यामुळे शेतीचे, पिकाचे मोठे नुकसान झाले. याबाबात मदत देण्याचे निर्देश सरकारने दिले होते. परंतु नुकसान जास्त असल्याने एनडीआरएफचे निकष ओलांडत मदत देऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगत, राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानबाधीत राज्यातील २५३ तालुक्यांसाठी ७ ऑक्टोबररोजी ३१ हजार कोटी रुपयांच्यावर विशेष मदत पॅकेज जाहीर केले. यामधील मदत देण्याबाबतचे मोठमोठे आकडे पाहून शेतकर्‍यांना काहीसा धीर आला. आज प्रत्यक्षात याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. यामध्ये नुकसानग्रस्तांना देण्यात येणार्‍या मदतीबाबत सविस्तर उल्लेख आहे व यानुसारच मदत द्यावी, असे नमूद आहे. त्यामध्ये सदर मदत दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरला देण्यात यावी, तसेच या अतिवृष्टी बाधित २५३ तालुक्यामध्ये जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीसाठी एक वर्ष स्थगिती, तिमाही वीज बिलात माफी व इयत्ता १० व १२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात फी माफी, आदी सवलती लागू होणार आहेत. त्यासोबत खरडून गेलेल्या जमिनीसाठी मनरेगातून अनुदान दिले जाणार आहे. खचलेल्या विहिरीसाठी ३० हजार रुपये रोहयोतून अनुदान देण्यात येणार असल्याचे सदर शासन निर्णय नमूद असून, याबाबतचा स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येईल, असेही यामध्ये नमूद आहे. त्यासोबतच इतरही नुकसानीसाठी मदतीचा उल्लेख आहे. एकंदरीत या आकड्यांमुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत होणे स्वाभाविक आहे. जिल्ह्यातील शेतकरीसुद्धा या विशेष मदत पॅकेजची आस लावून बसले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर, सिंदखेडराजा, बुलढाणा, शेगाव, नांदुरा, देऊळगावराजा, चिखली, मोताळा व खामगाव या तालुक्यांना या विशेष मदत पॅकेजचा लाभ होणार असून, मेहकर, लोणार, जळगाव जामोद व संग्रामपूर या तालुक्यांना सदर विशेषमधून वगळल्याचे दिसून येते आहे.


राज्यातील फडणवीस सरकारने दिलेल्या विशेष मदत पॅकेजमधून माजी मंत्री आ. संजय कुटे व केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचेच तालुके नेमके वगळण्यात आले आहेत. आ. संजय गायकवाड, आ. श्वेताताई महाले पाटील, आ. मनोज कायंदे व मंत्री आकाश फुंडकर यांच्या तालुक्यांना मात्र या विशेष मदत पॅकेजमध्ये स्थान मिळालेले आहे. त्यामुळे, या दोन नेत्यांचा राजकीय गेम करून त्यांच्या मतदारसंघातील शेतकरी वार्‍यावर सोडण्यात आले आहे का, अशी राजकीय चर्चादेखील जिल्ह्यात सुरू होती.


विशेष म्हणजे, दि. २५ व २६ जूनरोजी मेहकर व लोणार तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला, या पावसाने लाखाच्यावर एकरावरील पिके उद्ध्वस्त झाली तर शेकडो हेक्टर जमीन खरडून गेली. तसेच शासकीय मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, आमदार सिद्धार्थ खरातसह इतरांनी नुकसानीची पाहणीदेखील केली होती व शेतकर्‍यांना भरीव मदत देऊ, अशी ग्वाहीदेखील दिली होती. याबाबतचा वेळोवेळी पाठपुरावादेखील करण्यात आला. तर आमदार सिद्धार्थ खरात यांनी विधानसभेत सदर समस्या पोटतिडकीने मांडली होती व विशेष पॅकेजची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या विशेष मदत पॅकेजमध्ये अतिवृष्टीने मोठे नुकसान होऊनही मेहकर व लोणार या तालुक्यांना वगळल्याने शेतकर्‍यांमधून संताप व्यक्त होणे स्वाभाविक आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही तालुक्यांत आतापर्यंत १०० मिलीमीटरच्यावर पाऊस बरसला. याबाबत मेहकर निवासी, जिल्ह्याचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री मंत्री प्रतापराव जाधव, आमदार सिद्धार्थ खरात यांनी पक्षभेद विसरून शेतकर्‍यांसाठी एकीने शासनाकडे आणखी पाठपुरावा करून शेतकर्‍यांना धीर द्यावा, अशी रास्त मागणी आता होऊ लागली आहे.


याबाबत आमदार सिद्धार्थ खरात यांना विचारले असता, मेहकर व लोणार तालुक्यांचा समावेश सदर विशेष मदत पॅकेजमध्ये करणारच, अशी ठाम ग्वाही त्यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना दिली आहे.

Share This Article
Exit mobile version