– हनवतखेड धरणात तरंगत आढळलं प्रेत
– अतिवृष्टीनं पिकं उध्वस्त; कर्जाच्या विळख्यात शेतकरी बळी!
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – तालुक्यातील वाघाळा गाव पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्येमुळे हादरले आहे. वाघाळ्यातील ४२ वर्षीय तरुण शेतकरी मारुती रतन राठोड यांनी हनवतखेड येथील धरणात उडी घेऊन आत्महत्या केली. दोन दिवसांनी त्याचं प्रेत धरणात तरंगताना दिसलं आणि गावात शोककळा पसरली.
मारुती राठोड हे रोजच्या प्रमाणे १ ऑक्टोबररोजी रात्री शेतात रोही राखण्यासाठी गेले होते. मात्र दुसर्या दिवशी ते घरी न परतल्याने कुटुंबीयांना संशय आला. दोन दिवसांनी हनवतखेड धरणात त्यांचं प्रेत तरंगताना दिसून आल काल संध्याकाळी साखरखेर्डा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रेत बाहेर काढत पंचनामा केला. मारुती राठोड यांच्या आईच्या नावावर सहा एकर शेती होती. दोन भावांमध्ये प्रत्येकी तीन एकर शेती वाटून घेण्यात आली होती. मात्र यंदा तालुक्यातील अतिवृष्टी व ढगफुटीच्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं. हातउसने घेतलेलं कर्ज कसं फेडायचं, याच विवंचनेत मारुती राठोड घरून निघाले आणि नंतर ते परतलेच नाहीत!
कर्जाच्या विळख्यात शेतकरी संपले;प्रशासन मात्र बधीर!
शेतकर्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत असताना प्रशासन आणि सरकार मात्र ढिम्म आहे. पीकं उध्वस्त, कर्जाचा डोंगर, उत्पन्न शून्य – यामुळे शेतकर्यांचं आयुष्य अंधारमय झालं आहे. मारुती राठोड हे या दुर्दैवी शृंखलेतील आणखी एक बळी ठरले आहेत. या दुर्देवी घटनेने वाघाळा गाव शोकसागरात बुडालं आहे.

