ओला दुष्काळ व कर्जमाफीसाठी शेतकरी नेते किरण ठाकरे यांची ‘ज्योत यात्रा’

admin 2 Min Read
2 Min Read

– हजारो शेतकर्‍याचा सहभाग

वर्धा (प्रकाश कथले) – युवा संघर्ष मोर्चा आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकर्‍यांच्या मागन्याकरिता देवळी ते आगरगावपर्यंत काढलेल्या ज्योत यात्रेत हजारो शेतकरी सहभागी झाले, यात्रेचे नेतृत्व शेतकरी नेते किरण ठाकरे यांनी केले.

सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीनच्या दाण्याला कोंब फुटत आहे. कपाशी पिकावर देखील मर रोगाने आक्रमण केले आहे. उत्पन्नात मोठी घट होणार असल्यामुळे, वर्धा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची व शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुक्ती करण्याची सरकारला भवानी मातेने सद्बुद्धी द्यावी, तसेच या कठीण काळात शेतकर्‍यांना सावरण्याचे बळ द्यावे, ही आर्त हाक भवानी मातेला देण्याकरिता लहान मातामाय मंदिर येथून भव्य पायदळ ज्योत यात्रा काढण्यात आली. पायदळ निघालेल्या या ज्योत यात्रेत युवा संघर्ष मोर्चासह क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नांदोरा, पळसगाव येथील शेतकर्‍यांनी या पायदळ ज्योत यात्रेचे उत्साहात स्वागत केले. यावेळी किरण ठाकरे यांनी उपस्थित शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. रात्री नऊ वाजता ही ज्योत यात्रा आगरगावच्या भवानीमाता मंदिरात पोहोचली व सहभागी शेतकर्‍यांनी भवानी मातेची पूजाअर्चा करून ओला दुष्काळ जाहीर करावा व संपूर्ण कर्जमुक्ती करावी, अशी सरकारला सद्बुद्धी देण्याची आर्त हाक भवानीमातेला घालण्यात आली. त्यानंतर आगरगाव येथे यात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी समारोपीय सभेला किरण ठाकरे, प्रविण कात्रे, अ‍ॅड. मंगेश घुंगरूड यांनी  मार्गदर्शन केले.

Share This Article
Exit mobile version