– धार्मिक प्रथांचे पालन करण्याचा सर्वांना अधिकार; कोण सामाजिक तणाव निर्माण करतेय? ते शोधून काढू : फडणवीस
– वादग्रस्त रांगोळी काढणार्यासह, पोलिसांवर दगडफेक करणार्या 35हून अधिक जणांना अटक; संवेदनशील भागात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त!
अहिल्यानगर/यवतमाळ (विशेष प्रतिनिधी) – दुर्गामाता एकता दौडच्या मार्गात वादग्रस्त रांगोळी काढल्याने अहिल्यानगरमध्ये काल तणाव निर्माण होऊन दगडफेक व पोलिसांचा लाठीमार झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी वादग्रस्त रांगोळी काढणार्यासह पोलिसांवर दगडफेक तसेच दंगल भडकविण्याचा प्रयत्न करणार्या 35हून अधिक जणांना अटक केली आहे. तसेच, शहरातील संवेदनशील भागात कडेकोट बंदोबस्त आहे. या जमावाच्या दगडफेकीत ७ पोलिस गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, या घटनेबाबत यवतमाळ येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेमागे षडयंत्र असावे, असा संशय व्यक्त केला असून, धार्मिक प्रथांचे पालन करण्याचा सर्वांना अधिकार आहे; परंतु सामाजिक तणाव कोण निर्माण करत आहे? हे शोधून काढू, असा इशारादेखील फडणवीस यांनी दिला. लोकसभा निवडणुकीत ज्या प्रकारे सामाजिक व धार्मिक धृवीकरण करण्याचा प्रयत्न झाला होता, तसे प्रयत्न आता सुरू आहेत का, हेही पहावे लागेल, असेही फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, अहिल्यानगरचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले, की पोलिसांवर दगडफेक करणार्या 35पेक्षा अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सद्या परिस्थिती शांत असून, दोन्ही समुदयाच्या लोकांची शांतता बैठक घेण्यात आली आहे.
अहिल्यानगर शहरात वादग्रस्त रांगोळीमुळे धार्मिक तणाव निर्माण होऊन मुस्लीम समाजाने रस्ता रोको केला होता. जमावाला पांगविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेकदेखील झाली होती. याबाबत यवतमाळ येथे बोलताना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की अहिल्यानगर घटनेमागे काही षडयंत्र तर नाही ना, याचा तपास करणार आहोत. जो कुणी सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहे, त्याचा शोध घ्यावा लागणार आहे. धार्मिक प्रथांचे पालन करण्याचा सर्वांना अधिकार आहे, परंतु लोकसभेच्या निवडणुकीत ज्या प्रमाणे जातीय व धार्मिक धृवीकरणाचा प्रयत्न झाला तसे प्रयत्न आता सुरू आहेत का, याचा आम्ही शोध घेऊ. दरम्यान, कालच्या दगडफेकप्रकरणी पोलिसांनी 35हून अधिक जणांना अटक केली असून, या घटनेचा पोलिस कसून तपास करत आहेत. तसेच, वादग्रस्त रांगोळी काढणार्या माळीवाडा येथील संग्राम आसाराम रासकर याला पोलिसांनी कालच अटक केली होती. त्याच्यासह त्याच्या पत्नीने ही वादग्रस्त रांगोळी काढली होती. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी काल हिंदू व मुस्लीम समाजाची शांतता बैठक घेऊन दोन्हीही समाजाला शांततेचे आवाहनदेखील केले होते. याशिवाय, शहरामध्ये संवेदनशील ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, रूटमार्चदेखील घेण्यात आला होता. यासह नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक यांनीदेखील शहरात भेट देऊन संवेदनशील स्थितीची माहिती घेऊन पोलिसांना सूचना केल्या होत्या.
काल, दि. २९ सप्टेंबररोजी सकाळी ७ वाजता दुर्गामाता दौड ही नियोजित होती. इम्पेरिअल चौक ते मंगलगेट देवी मंदीर या नियोजित मार्गावर बारतोटी कारंजा माळीवाडा येथे श्रीमती आरती संग्राम रासकर व संग्राम आसाराम रासकर (रा. बारातोटी कारंजा, माळीवाडा) यांनी या दौडचे स्वागत करण्यासाठी रस्त्यावर रांगोळी काढली. परंतु, या रांगोळीमध्ये ‘आय लव्ह मोहम्मद’ असे रेखाटले गेले. सदर घटना लक्षात आल्यानंतर लगेचच ही रांगोळी काढून टाकण्यात आली. तसेच, पोलिसांनी या रासकरविरोधात गुन्हाही दाखल केला होता. परंतु, कुणी तरी या घटनेचा व्हिडिओ काढून व्हायरल केल्याने मुस्लीम समाजात तणाव निर्माण झाला. मुस्लीम समाजाचा जमाव कोतवाली पोलिस ठाण्यात गेला असताना पोलिसांना सौम्य लाठीमार करून जमाव पांगवावा लागला. नंतर हा संतप्त जमाव कोठला येथे गेला व पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्ग रोखून धरला. पोलिसांनी समजावून सांगून व विनंती करूनही जमाव ऐकत नसल्याचे पाहून पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमाव पांगविला होता. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असून, पोलिस समाजकंटकांची धरपकड करत आहेत. आतापर्यंत 35हून अधिक जणांना अटक करण्यात आली असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

