– ग्रामपंचायतीने पंचायत समितीला पाठवलेले प्रस्ताव रखडले!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल मंजूर झालेल्यांचे अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्या मागणीला घेऊन माजी उपसरपंच असलम अंजुम आणि सामाजिक कार्यकर्ते मो. फयाज हे आज (दि.२९) पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत.
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना या महत्वांकांक्षी योजनेतून गत जून महिन्यात साखरखेर्डा ग्रामपंचायतला १ हजार १४३ घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट प्राप्त झाले. अनेक वर्षांपासून गावठाणात अतिक्रमण करुन वास्तव्यास असलेले दोनशेच्या जवळपास अतिक्रमण धारकांचे प्रस्ताव प्रलंबीत आहेत. त्याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला विचारले असता, त्या सर्वांचे अतिक्रमण नियमाकुल करण्यासाठीचे प्रस्ताव पंचायत समितीला पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. परंतु, त्यावर अत्यंत धीम्यागतीने कार्यवाही होतांना दिसत असल्याने माजी उपसरपंच असलम अंजुम आणि सामाजिक कार्यकर्ते मो. फयाज यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती सिंदखेडराजा यांना एका निवेदनाद्वारे सदरहू नियमाकुल प्रस्तावांना मंजुरात देऊन त्यांचे खात्यात घरकुलाचा पहिला हप्ता १५ हजार रूपये त्वरित जमा करण्याची मागणी केली. त्यावर कोणतीच कार्यवाही न केल्याने शेवटी २२ सप्टेंबररोजी उपविभागीय अधिकारी सिंदखेडराजा यांच्याकडे धाव घेत निवेदन दिले होते.
तसेच मागणी त्वरित मान्य न झाल्यास २९ सप्टेंबरपासून साखरखेर्डा ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. उपरोक्त मागणीवर प्रशासनाकडून कोणताही तोडगा न निघाल्याने शेवटी माजी उपसरपंच असलम अंजुम आणि सामाजिक कार्यकर्ते मो. फयाज हे आपल्या निर्णयावर ठाम असून, आजपासून ते आमरण उपोषणाला बसले आहेत. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील, माजी सरपंच महेंद्र पाटील, माजी सरपंच चंद्रशेखर शुक्ल, माजी उपसभापती सुनील जगताप, ग्रामपंचायत सदस्य उल्हास देशपांडे, संदीप खिल्लारे, दिलीप बेंडमाळी, संतोष जैस्वाल यांनी पाठिंबा दर्शविला आहे. उपोषणाला सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याने शासनाने याची दखल त्वरीत घ्यावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील यांनी केली आहे.

