– स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानांतर्गत उपक्रम – नागरिकांना मोफत तपासण्या व सेवा!
जालना/सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – नागरिकांच्या आरोग्याचा ध्यास घेत जालना जिल्हा रुग्णालय, जालना रुग्णालयात उद्या, दिनांक ३० सप्टेंबर रोजी ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानांतर्गत सर्वरोग निदान शिबीर व रक्तदान शिबीराचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये किशोरवयीन मुलं-मुली, महिला व पुरुषांसाठी विविध आरोग्य तपासण्या, उपचार आणि संदर्भ सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध होणार आहेत. रक्त तपासणी, हिमोग्लोबिन, बीपी व शुगर तपासणी, महिलांचे आजार व कॅन्सर तपासणी हाडांच्या तक्रारींसाठी तपासणी, आभा कार्ड व आयुष्यमान कार्ड नोंदणी, रक्तदान शिबीर आदी सेवा या शिबिरात दिल्या जाणार आहेत. या शिबिरात ग्रामीण व शहरी भागातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र गाडेकर यांनी केले आहे.

