– पुणे – छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रस्ता रोको
– जमाव पांगविण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीमार
– परिस्थिती नियंत्रणात, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन
अहिल्यानगर (विशेष प्रतिनिधी) – अज्ञात व्यक्तीने रस्त्यावर ‘आय लव्ह मोहम्मद’ अशी रांगोळी काढल्याने व त्यावरून दुर्गामाता दौडचे आयोजन केले गेल्यामुळे शहरातील मुस्लीम समाजात संतापाची लाट निर्माण झाली होती. जमावाने पोलिस ठाण्यात धाव घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी जमाव पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला व जमाव हटविण्यात आला. त्यामुळे संतप्त झालेला हा समाज रस्त्यावर उतरला. जमावाने पुणे – संभाजीनगर महामार्गावर रस्ता रोको सुरू केल्याने वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली. सद्या तणावपूर्ण शांतता असून, शहरवासीयांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले आहे.
अहिल्यानगरचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले, की आज सकाळी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत रोडवर रांगोळी काढण्यात आली होती. त्या रांगोळीवर मुस्लीम समाजाच्या लोकांनी आक्षेप घेतला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच ज्यांनी रांगोळी काढली त्याला अटकही करण्यात आली होती. त्यानंतरही काही मुस्लीम समाजाच्या लोकांनी कोटला येथे रस्त्यावर येऊन रास्ता रोको केला. पोलिसांनी त्यांना तेथून निघून जाण्याची सूचना केली. त्यांना विनंती केली. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांनी अचानक दगडफेक सुरू केली. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून जमाव पांगवला. यावेळी काही लोकांना ताब्यात घेण्यात आले. पोलिस पुढील कारवाई करत आहेत. मी सर्वच समाजाच्या लोकांना याद्वारे आवाहन करतो की, कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. अहिल्यानगर शहरात शांतता आहे. दगडफेक करणार्यांना समाजकंटकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

