शेवगाव, पाथर्डीत आभाळ फाटलं; नद्यांना महापुराने हाहाकार!

admin 6 Min Read
6 Min Read

– महामार्ग ठप्प पडल्याने वाहतूक विस्कळीत; आठ दिवसांत सलग पाचव्यांदा नद्यांना महापूर
– अनेक गावांची रात्र जागून; तातडीने आर्थिक मदतीसह जीव वाचविणे महत्वाचे!
– शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात; बळीराजाच्या तोंडाचा घास हिरावला!

शेवगाव/पाथर्डी (बाळासाहेब खेडकर) – शेवगाव व पाथर्डी तालुक्यात अक्षरशः आभाळच फाटले असून, नद्यांना महापूर आले आहेत. शेवगाव तालुक्यातील नंदिनी, ढोरा, रेडीसह छोट्या मोठ्या नद्यांना महापूर आल्याने देवटाकळी, बक्तरपूर येथे शेकडो जण पुरात अडकले होते, पण त्यांना सुरक्षितस्थळी हलविले गेले. शेवगाव व पाथर्डीला जोडणारे रस्ते जलमय झाल्याने वाहतूक ठप्प होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. काल, सायंकाळी काही प्रमाणात महापुराचे पाणी कमी झाल्याने वाहतूक सुरळीत झाली. मात्र महापुराची परिस्थिती भयावह झाल्याने मदतीसाठी आपत्तीकालीन यंत्रणेला पाचारण करावे लागले होते. शनिवारपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी रात्र जागून काढली. तालुक्यातील मिरी येथे चार ते पाच घरांची पावसामुळे पडझड झाली असून, पाथर्डी शहरातील रंगारगल्ली येथील विठ्ठल मंदिराची भिंत कोसळली. मागील पावसात खरमाटवाडी गावाला पाण्याने वेढा टाकला होता. यावेळीही नदीने धोक्याची पातळी गाठली होती, त्यामुळे संपूर्ण परिसर भीतीच्या छायेखाली होता.

परतीच्या मान्सूनने तालुक्यात जोरदार हजेरीमुळे अनेक वर्षापासूनच पावसाने पूर्णपणे रेकार्ड ब्रेक केले आहे. शनिवारी रात्री व रविवारी पहाटे झालेल्या पावसामुळे नद्यांना पाचव्यांदा महापूर आल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. शेवगाव शहरात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊन क्रांती चौकातील सिद्धीविनायक मंदिरात पाणी शिरले होते, तसेच सूर्यकांत नदीला आलेल्या पुरामुळे व रस्ते जलमय झाल्याने पैठण, गेवराई राज्य मार्ग बंद झाला होता. दुपारपर्यंत सर्व वाहतूक ठप्प झाली होती. नंतर ती सुरूळीत करण्यात आली. नांदणी नदीला पुन्हा महापूर आल्याने आखेगाव, वरूर, भगूर, वडुले बुद्रुक, जोहरापूर, भागाला फटका बसला. महापुरामुळे सर्व वाहतूक बंद झाली होती, तसेच ढोरा नदीला आलेल्या महापुरामुळे वडुले खुर्द, वाघोली, ढोरजळगाव, अखतवडे, भागात पुन्हा फटाका बसला गेला. पूर्व भागात बोधेगाव, परिसरातील काशी नदीला पूर आल्याने लाडजळगाव, हातगाव, मुंगी भागातील शेतकर्‍यांना मोठा फटका बसला. शेती पिके भुईसपाट झाल्याने संपूर्ण हातातून गेली आहेत. रेडी नदीला पूर आल्याने गुंफा, काळेगाव, बक्तरपुर, देवटाकळी परिसरात फटका बसला. शेतात पुराचे पाणी आल्याने शेत जलमय झाले होते. गुंफा येथे काल सकाळी ९ वाजता नेवासा रोडवर चारचाकी वाहन जाताना पाण्याचा अंदाज न आल्याने पुराच्या पाण्यात अडकले, पण तात्काळ ग्रामस्थानी मदत करुन बाहेर काढण्यात आले. देवटाकळी येथे सकाळी नदीला महापूर आल्याने वसंत मेरजे वस्तीवर आठ जण पुरात अडकले होते. सरपंच अशोक मेरड यांनी तत्काळ सदरची माहिती तहसीलदार अशोक दहाडदे, माजी आ.चंद्रशेखर घुले यांना सांगितल्यानंतर घुले यांनी प्रांताधिकारी प्रसाद मते, उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांना माहिती देऊन हेलिकॉप्टरची मागणी केली. घटनास्थळी हेलिकॉप्टर येण्यास उशीर होऊ लागल्याने तोपर्यंत अरुण लोखंडे, वसंत मेरड, योगेश मेरड यांनी चप्पूच्या साहाय्याने मोठ्या धाडसाने मिरजे वस्ती गाठून आठ जणांना ग्रामस्थांच्या मदतीने पुराच्या पाण्यातून बाहेर काढले. त्यांमध्ये कृष्ण मिरजे (वय ३०) हा अपंग व्यक्ती होता. त्यांना योगेश मेरड या युवकाने पाण्यातून डोक्यावर उचलून बाहेर काढले व प्राण वाचविले गेले. तर तसेच गुलाबभाई शेख, वाघमारे वस्तीवरील सुमारे ४० ते ४५ नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते, त्यांना ग्रामस्थांच्या मदतीने सुरक्षितस्थळी हटविण्यात आले असल्याची माहिती सरपंच मेरड यांनी दिली. बक्तपुर गाव व खरड वस्तीला महापुराने वेढा घातला होता. प्रथमच हा महापूर आल्याने जनता अत्यंत भयभीत झाली होती. पूरपरिस्थिती नियंत्रणासाठी आ. मोनिका राजळे, खा. नीलेश लंके यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.


गुंफा, काळेगाव, बक्तरपुर, देवटाकळी परिसरात पुराचे पाणी गावासह शेतवस्तीमध्ये घुसल्याने पुरात अडकलेले नागरिक भयभीत झाले होते. जीव महत्वाचा असल्याने जनतेला दिलासा देऊन पुराच्या वेढ्यातून बाहेर काढणे महत्वाचे होते. तत्काळ प्रशासनला घटनेची माहिती दिल्याने त्यांनी गांभीर्यानी आपत्तीकालीन यंत्रणा हलवून जनतेला दिलासा दिल्याचे माजी आ. चंद्रशेखर घुले यांनी सांगितले.


जायकवाडी जलाशयातून सुमारे सव्वा दोन लाख क्युसेस पाणी गोदावरीत सोडल्यामुळे महापुराचा धोका होऊ नये म्हणून प्रशासनाने तहसीलदार अशोक दहाडदे यांनी भेट देऊन ग्रामस्थांना पूर्व सूचना दिल्या आहेत. दुसरीकडे, पाथर्डी तालुक्यात शनिवारपासून पाऊस सुरू आहे. या पावसाने तालुक्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत होत्या. विशेषतः बीड लगतच्या सर्वच गावांना पावसाने झोडपून काढले. भालगाव, खरमाटवाडी, खरवंडी जवळवाडी, मालेवाडी, कीर्तनवाडी, मुंगूसवाडे, एकनाथवाडी, दैत्यनांदूर, भगवानगड परिसर, पिंपळगव्हाण, टाकळीमानूर, चुंभळी, मीडसांगवी, वडगाव, जोगेवाडी, चिंचपूर पांगुळ, ढाकणवाडी, चिंचपूर इजदे, कुत्तरवाडी, पिंपळगाव टप्पा या परिसरात जास्त पाऊस झाला. त्याचबरोबर पश्चिम भागातील मढी, करंजी, तिसगाव, वृद्धेश्वर परिसर, घाटशिरस या परिसरातही जोरदार पाऊस झाला. करंजी येथे पुलावरून पाणी सुरू असल्याने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही तास बंद होती. अकोला गावाजवळील नदीला पूर आल्याने पालवेवाडी, मोहोजदेवढे, जांभळी या गावांचा दुपारपर्यंत संपर्क तुटलेला होता. या पावसामुळे उरलेसुरली पिके पाण्यात गेली असून, जनावरांच्या चार्‍यांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अतिवृष्टीचा इशारा देऊन प्रशासनाने नदीकाठी राहणार्‍या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले होते. पावसात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र उरलीसुरली पिके व अन्नधान्य पाण्यात गेल्याने शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मिरी येथे चार ते पाच घरांची पावसामुळे पडझड झाली आहे. तर पाथर्डी शहरातील रंगारगल्ली येथील विठ्ठल मंदिराची भिंत कोसळली. मागील पावसात खरमाटवाडी गावाला पाण्याने वेढा टाकला होता. यावेळीही नदीने धोक्याची पातळी गाठली होती. त्यामुळे संपूर्ण परिसर भीतीच्या छायेखाली होता. पाथर्डी शहरात शनिवारी झालेल्या पावसामुळे प्रभाग क्रमांक ७ मधील रंगार गल्ली या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिराची भिंत पडली. त्यामुळे मंदिराचे मोठे नुकसान झाले आहे.

Share This Article
Exit mobile version