– ७० वर्षे आरक्षणाची प्रतीक्षा; उपोषण तीव्र, जलसमाधीचा इशारा! – दीपक भाऊ बोराडे यांचे उपोषण दहाव्या दिवशीही सुरूच! – मांजरा नदीत उड्या मारून जलसमाधीचा इशारा! – अखिल भारतीय छावा संघटनेचा ठाम पाठिंबा! – सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर उग्र आंदोलनाचा इशारा!
जालना/सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – घटनेने धनगर समाजाला दिलेले एस.टी. आरक्षण गेली ७० वर्षे लागू न झाल्याने समाजात तीव्र नाराजी आहे. वेळोवेळी रास्तारोको, ढोलबजाओ आंदोलन, मुंडन आंदोलन, टक्कर मोर्चा, निवेदन, उपोषण अशा अनेक मार्गांनी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला; मात्र अद्यापही धनगर समाजाच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्षच केले आहे. याच पार्श्वभूमीवर दीपकभाऊ बोराडे हे जालना येथे सलग दहा दिवसांपासून उपोषणास बसले आहेत. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असून, २८ सप्टेंबर रोजी काही युवकांनी मांजरा नदीत उडी मारून जलसमाधी घेण्याचा इशारा दिल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.
अखिल भारतीय छावा संघटनेने या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत सरकारवर जोरदार टीका केली. “७० वर्षे थांबलो, आता सहनशक्ती संपली आहे. सरकारने तातडीने धनगर समाजाला घटनेने दिलेले आरक्षण लागू करावे, अन्यथा अखिल भारतीय छावा संघटना संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन उभारेल,” असा इशारा केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी दिला. या वेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक चिंचोळे, मराठवाडा कार्यध्यक्ष विलास कोल्हे, जालना अध्यक्ष राधेश्याम पवळ, जालना संपर्क प्रमुख मच्छिंद्र घोगरे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष अशोक राजे जाधव, संभाजीनगर जिल्हाध्यक्ष अशोक मोरे, सहसचिव श्रीकांत मलिशे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजय कांबळे, शिक्षक आघाडी अध्यक्ष सिताराम वाघ, ठाणे कार्याध्यक्ष अमरनाथ गुप्ता, बुलढाणा कार्याध्यक्ष कृष्णा कोल्हे, शिंदखेडराजा तालुका अध्यक्ष बाळासाहेब शेळके, संघटक शंकरराव शिंदे यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. छावा संघटनेच्या पाठींब्यामुळे या आंदोलनाला वेग आला असून, शासनाने तातडीने ठोस निर्णय न घेतल्यास महाराष्ट्रात उग्र आंदोलन पेटण्याची चिन्हे आहेत.