ओला दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; आक्रमक शिवसैनिकांचा डीपीसीच्या बैठकीत घुसण्याचा प्रयत्न!

admin 4 Min Read
4 Min Read

– प्रा. नरेंद्र खेडेकर, आ. सिद्धार्थ खरात, संदीपदादा शेळके, जयश्रीताई शेळके यांच्या नेतृत्वात शिवसेना आक्रमक!
– पोलिसांच्या शिष्टाईने तणाव निवळला; शेतकरीहिताच्या मागण्यांचे पालकमंत्र्यांना निवेदन

बुलढाणा (सुरेश हुसे/राजेश लोखंडे) – सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना तातडीची मदत मिळावी, यासाठी शिवसेना (ठाकरे) पक्षाने आज (दि.26) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हा समन्वयक संदीपदादा शेळके, आ. सिद्धार्थ खरात, शिवसेना प्रवक्त्या अ‍ॅड. जयश्रीताई शेळके यांच्या नेतृत्वात शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या आंदोलनादरम्यान पालकमंत्री तथा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. जिल्ह्यातील हजारो नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकर्‍याच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा करा, अथवा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शेतकर्‍यांसह घुसण्याचा रोखठोक इशारा शिवसेनेने दोन दिवसापूर्वीच दिला होता. त्याप्रमाणे गनिमी काव्याचा वापर करीत आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घुसण्याचा प्रयत्न केला. काही शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर चढून आत उडी मारण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी व जलद कृती दलाने त्यांना आत जाण्यापासून रोखले. यावेळी घटनास्थळी तणावाचे वातावरण तयार झाले. शिवसैनिकांच्या गगनभेदी घोषणानी वातावरण आणखी तापले. मात्र वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी समोपचाराची भूमिका घेत, शिष्टमंडळाला पालकमंत्री मकरंद पाटील यांची भेट घेण्याची तयारी दर्शविली. यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी संयमी भूमिका घेत, पोलिसांची शिष्टाई व मागणी मान्य केली. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील तणाव निवळला होता.

शासनाने शेतकर्‍यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत जाहीर करावी, अशी मागणी यावेळी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, आमदार सिद्धार्थ खरात, शिवसेना जिल्हा समन्वयक संदीपदादा शेळके, पक्ष प्रवत्तäया अ‍ॅड.जयश्रीताई शेळके, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, गजानन वाघ, सहसंपर्कप्रमुख छगनदादा मेहेत्रे, वसंतराव भोजने, डी. एस. लहाने, सुमित सरदार, लखन गाडेकर, प्रा. आशीष रहाटे, गजानन ठोसर, विलास सुरडकर, तुकाराम काळपांडे, गजानन धांडे, सुनील घाटे, तालुकाप्रमुख विजय इतवारे, राजेंद्र वाघ, संतोष दांडगे, विजय किसन धोंडगे, इंगळे, श्रीराम खिलदार, दीपक चांभारे, आत्माराम शेळके, ईश्वर पांडव, अशोक गव्हाणे, नारायण हेलगे यांच्यासह जिल्ह्यातील शहरप्रमुख, उपतालुकाप्रमुख व सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसैनिकांच्या या धडक आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.


बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात आज (दि.26) दुपारी पालकमंत्री मकरंद आबा पाटील, सहपालकमंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्ह्यातील जवळपास सर्वच लोकप्रतिनिधी आणि विविध प्रशासकीय विभागाचे प्रमुख बैठकीला उपस्थित होते. दरम्यान, दुपारच्या सुमारास शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी बैठकीत घुसण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर चढून शिवसैनिक आत घुसण्याचा प्रयत्न करत होते. बुलढाणा विधानसभा संघटक सुनील घाटे हे लोखंडी गेटवर चढले. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करीत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. तसेच जिल्हा समन्वयक संदीपदादा शेळके, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, गजानन वाघ, राज्य प्रवत्तäया जयश्री शेळके यांची मनधरणी केली. यामुळे डीपीडीसी बैठकीत घुसण्याचा निर्णय शिवसेनेने मागे घेतला. यानंतर शिष्टमंडळाने राज्याचे मदत, पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी करा, अतिवृष्टी बाधित शेतकर्‍यांना हेक्टरी ५० हजार रूपये मदत द्या, यासह विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. यावेळी पालकमंत्र्यांनी या मागण्यावर कारवाईचे आश्वासन दिले. युती शासन शेतकर्‍यान्च्या पाठीशी असून, त्यांना सर्वतोपरी मदत देण्याची ग्वाही ना. पाटील यांनी दिली.
—————–

Share This Article
Exit mobile version