नियमांवर बोट न ठेवता शेतकर्‍यांना मदत करा!

admin 2 Min Read
2 Min Read

– आमदार राजेश बकाने यांची पालकमंत्र्यांच्या बैठकीत आक्रमक मागणी

वर्धा (प्रतिनिधी)- जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले असून, मी शेतकर्‍याची संकट व्यथा शेतात जाऊन अनुभवली आहे. त्यामुळे शासनाने शेतकर्‍यांना दिलासा मिळावा, याकरिता नियमांच्या अडथळ्यांत न अडकता मदत करावी, अशी ठाम भूमिका आमदार राजेश बकाने यांनी मांडली.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच झालेल्या आढावा बैठकीत आमदार बकाने यांनी थेट अधिकार्‍यांना उद्देशून सांगितले की, ‘शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी आहे. तेव्हा शासकीय कागदोपत्री प्रक्रिया शेतकर्‍यांसाठी ओझे ठरू नये. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत मिळवून देणे हेच आपल्या सगळ्यांचे प्राधान्य असले पाहिजे. नियमांवर बोट ठेवून मदत अडवली गेली, तर ते अन्यायकारक ठरेल. बैठकीला पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन, जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुद्ध राजुरवार, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताळे, उपविभागीय अधिकारी दीपक करंडे, उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे, तहसीलदार समर्थ क्षीरसागर, तहसीलदार संदीप पुंडेकर, नायब तहसीलदार सागर कांबळे आदी उपस्थित होते. शेतकर्‍यांची वेदना प्रत्यक्ष पाहिली असे सांगताना, आमदार बकाने यांनी मागील आठवडाभरापासून अतिवृष्टीग्रस्त भागांना भेट देऊन शेतकर्‍यांशी संवाद साधला असल्याचे स्पष्ट केले. सोयाबीनसह इतर पिकांचे नुकसान, शेतजमिनीत झालेला चिखल, पिकांवरील रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचे आमदार बकाणे यांनी सांगितले. ही वेळ शेतकर्‍याच्या पाठीशी उभे राहण्याची आहे, असे ते म्हणाले. त्यांनी मदतवाटपाची प्रक्रिया गतीमान करा, अशी सूचना केली, सोबत नुकसान पंचनामे प्रामाणिकपणे व तातडीने पूर्ण व्हावेत, शेतकर्‍यांच्या याद्या वेळेत पोर्टलवर अपलोड व्हाव्यात आणि ई-केवायसी मोहिमेद्वारे मदत त्यांच्या खात्यावर पोहोचली पाहिजे, असेही सुनावले.

Share This Article
Exit mobile version