नुकसानग्रस्त भागातील शेतकर्‍यांची कर्जवसुली थांबविणार!

admin 2 Min Read
2 Min Read

– कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती; शेतकर्‍यांना दिलासा!
– दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांच्या खात्यावर मदत जमा होणार!

छत्रपती संभाजीनगर (जिल्हा प्रतिनिधी) – राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असून, शासन गंभीरतेने याचा आढावा घेत आहे. ज्या भागात पिकांचे नुकसान झाले आहे, त्या ठिकाणी कर्जवसुली थांबवलीच पाहिजे. त्याबाबत राज्य सरकार बँकांना स्पष्ट सूचना देणार आहे, अशी माहिती बुधवारी (दि.२४) राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच, दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांच्या खात्यावर मदत जमा होईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

कृषीमंत्री भरणे म्हणाले, की जालना जिल्ह्यात तब्बल २ लाख ५४ हजार एकर क्षेत्र पिकांचे नुकसान झाले आहे. नांदेड जिल्हा सर्वाधिक नुकसानग्रस्त असून, अनेक शेतकरी संकटात सापडले आहेत. सर्वत्र पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून, महसूल आणि कृषी विभागाचे कर्मचारी स्वतः शेतावर जाऊन तपासणी करत आहेत. शेतकर्‍यांना कोणतेही फोटो काढून देण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट करत, राज्य सरकारने नुकसानीसाठी मदतीची प्रक्रिया गतीमान असून, मंगळवारी (दि.२३) शासनाकडून २२१५ कोटी रुपये निधी जमा करण्यात आला आहे. दरम्यान, अजूनही आकडेवारी वाढत आहे. त्या प्रमाणात थेट शेतकर्‍यांच्या खात्यात मदत जमा केली जाईल. दिवाळीपूर्वी कोणतीही मदत थांबणार नाही, प्रत्येक शेतकर्‍याला दिलासा मिळेल, असे आश्वासन भरणे यांनी यावेळी दिले.


कृषीमंत्री भरणे म्हणाले, की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री स्वतः शेतकरी बांधवांची भेट घेऊन परिस्थितीचा थेट आढावा घेत आहेत. पावसामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. शेतकर्‍यांवरील कर्जवसुली थांबवण्याच्या निर्णयामुळे त्यांना दिलासा मिळणार असून, पंचनाम्यांनंतरची मदत थेट बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे या संकट काळात शेतकरी एकटे नाहीत, शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असेही मंत्री भरणे यांनी यावेळी सांगितले.

Share This Article
Exit mobile version