ज्वारी खरेदीला अखेर ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

admin 3 Min Read
3 Min Read

– केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतली अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांची भेट
– बंद पडलेली ज्वारी खरेदी अखेर प्रतापरावांच्या मध्यस्थीने सुरू; शेतकर्‍यांना दिलासा!

बुलडाणा (राजेश लोखंडे) – ज्वारी खरेदीला राज्य सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी दि. १६ सप्टेंबरला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची मुंबई येथे भेट घेऊन बंद पडलेली ज्वारी खरेदी सुरू करावी व ज्वारी खरेदीला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली होती. ज्वारी उत्पादक शेतकर्‍यांची व्यथा त्यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासमोर मांडल्यानंतर राज्य सरकारने तातडीने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला. व केंद्र सरकारनेदेखील त्याला तातडीने मंजुरी दिली. परिणामी,  दि. १८ सप्टेंबररोजी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्यावतीने परिपत्रक काढून ज्वारी खरेदीला मुदतवाढ देण्यात आली आहे.

यावर्षी राज्यात ज्वारी लागवडमध्ये वाढ झाल्यामुळे उत्पादनातही वाढ झाली आहे. खुल्या बाजारामध्ये ज्वारीचे दर कमी असल्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होत आहे. पश्चिम विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्वारीची लागवड मोठ्या प्रमाणावर झालेली असून, शेगाव, खामगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद व इतरही भागात शेतकर्‍यांनी हमीभाव ज्वारी खरेदीकरिता नोंदणी केली आहे. परंतु दरम्यानच्या काळात शासकीय हमीभाव खरेदी केंद्र बंद पडल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांनी केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे ज्वारी खरेदी केंद्र सुरू करावे व मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार १६ सप्टेंबररोजी प्रतापराव हे मुंबई जिल्ह्याच्या दौर्‍यावर असताना त्यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन ज्वारी खरेदी संदर्भातील शेतकर्‍यांच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. सरकारचा हमीभाव जास्त आहे, पण खरेदी केंद्र बंद पडल्यामुळे शेतकर्‍यांना ही ज्वारी खुल्या बाजारात कमी दराने विकावी लागत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकर्‍यांची आर्थिक नुकसान टाळण्यासाठी बंद पडलेले खरेदी केंद्र पुन्हा सुरू करून ज्वारी खरेदीला मुदतवाढ द्यावी, अशी अपेक्षा ना. प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केली होती. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शेतकर्‍यांच्या मागणीला सकारात्मकता दर्शवीत मुदतवाढ देण्याचे आश्वासन प्रतापरावांना दिले होते. त्यानुसार १८ सप्टेंबररोजी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्यावतीने ज्वारी खरेदीला मुदतवाढ देण्यात आल्याचे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. त्यामुळे आता ज्वारी उत्पादक शेतकर्‍यांना त्यांच्याकडे असलेली ज्वारी ही हमीभावाने शासनाला देण्याचा मार्ग खुला झाला आहे.

Share This Article
Exit mobile version