– विविध क्षेत्रातील मान्यवरांचा मूकनायक फाउंडेशनद्वारे होणार सन्मान
बुलढाणा/चिखली (महेंद्र हिवाळे) – विविध देशातील नावलौकिक असलेल्या भिख्खू संघाच्या उपस्थितीमध्ये बुलढाणा येथे मूकनायक फाउंडेशनद्वारे दि. २२ नोव्हेंबररोजी जागतिक धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या धम्म परिषदेला भारत, चीन, जपान, थायलंड, श्रीलंका, मलेशियासह इतर बौद्ध देशातील भिख्खूदेखील उपस्थित राहणार आहेत. या धम्म परिषदेमध्ये विविध क्षेत्रातील नावलौकिक असलेल्या व्यक्तिमत्त्वांचा मूकनायक फाउंडेशन द्वारा प्रतिष्ठेचा समजला जाणारा मूकनायक पुरस्कार देऊन गौरवदेखील करण्यात येणार आहे.
मूकनायक पुरस्कारासाठी कला, वैद्यकीय, संरक्षण, विधी, शिक्षण, तंत्रज्ञान, उद्योग, समाजकार्य, साहित्य व प्रशासन इत्यादी क्षेत्रातील दखलपात्र कामगिरी करणार्या मान्यवरांनी आपल्या कार्याचा अहवाल दोन प्रतीमध्ये पाठविण्याचे आवाहन मूकनायक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सतीश पवार यांनी केले आहे. पुरस्कारासाठी अहवाल पाठविण्याची मुदत दि.१० ऑक्टोंबरपर्यंत असून, दोन प्रतीमध्ये पाठवणे बंधनकारक असणार आहे. या सोबतच समाजातील उद्योजकांना चालना देण्यासाठी व नवउद्योजक होऊ इच्छिणार्या तरुणांसाठी बिझनेस एक्सपोचेदेखील आयोजन करण्यात आलेले आहे. या एक्सपोमध्ये देखील उद्योजक महिला बचत गट व इच्छूक तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, याचेदेखील आवाहन मूकनायक फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश पवार यांनी केले आहे. गेल्यावर्षी मूकनायक फाउंडेशनद्वारे आयोजित जागतिक धम्मपरिषदेला विविधस्तरातून बौद्ध धम्म बांधवांचा उत्स्फूर्त व प्रचंड प्रतिसाद लाभला होता. बुलढाणा जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील बौद्ध अनुयायांची उपस्थितीदेखील दखलपात्र होती. चक्रवर्तीसम्राट महान राजा अशोक यांच्या पाऊलखुणांनी पवित्र झालेल्या ऐतिहासिक अशा बुलढाणा जिल्ह्यामध्ये जागतिक धम्म परिषदेचे आयोजन हे बौद्ध धर्म अनुयायांसाठी एक पर्वणी ठरणार आहे.