मुंबईवगळता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार!

admin 2 Min Read
2 Min Read

– अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल यांची घोषणा
– स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ही पक्षवाढीसाठीची संधी – प्रफुल्ल पटेल

पुणे/नागपूर (प्रतिनिधी) – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले असताना, महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने मोठी घोषणा केली. मुंबई महापालिका निवडणूक वगळता राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचा निर्णय पक्षाचे नेते प्रफुल पटेल यांनी जाहीर केला आहे. पक्षाचे नागपुरात शिबीर सुरू आहे. शिबिराच्या पहिल्याच दिवशी महापालिका आणि स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाने स्वबळावर लढण्याची घोषणा केली. प्रफुल पटेल यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलताना ही घोषणा केली.

सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी २०२६ अखेरपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दोनच दिवसांपूर्वी दिलेले असताना, सगळेच राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिकमध्ये कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळावा घेऊन पक्षात जाण फुंकली. भारतीय जनता पक्षानेही मुंबईत कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करून ‘मुंबई आपलीच’ असा नारा दिला. पाठोपाठ अजित पवार यांच्या पक्षाचेही नागपुरात शिबीर सुरू आहे. शिबिराच्या पहिल्याच दिवशी महापालिका आणि स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाने स्वबळावर लढण्याची घोषणा करून प्रफुल्ल पटेल यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत महायुती नसेल, असे स्पष्ट केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येच खर्‍याअर्थाने पक्षवाढ होते, म्हणून मुंबई वगळता इतर ठिकाणी स्वबळावर लढणार असून, पक्ष वाढवायचा म्हटल्यावर निवडणुकांत अनेकांना संधी द्यावी लागते. त्यामुळे मुंबई वगळता आमचा पक्षाने उर्वरित महाराष्ट्रात स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.


महायुतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे स्थान असून, या पक्षाला ग्रामीण भागात मोठा जनाधार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी सोबत नसेल तर शिंदे गटाला ग्रामीण भागात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अनेक जागांवर शिंदे गट व अजित पवार गटात सरळ सरळ सामना होण्याची शक्यता असून, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत शिंदे गटाच्या जागा घटू शकतात, असेही राजकीय धुरिणांचे मत आहे.

Share This Article
Exit mobile version