विनायक मेटे यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

editor 3 Min Read
3 Min Read

– अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची अलोट गर्दी
– मराठा आरक्षणाचे स्वप्न पूर्ण करणे हेच मेटेसाहेबांना आदरांजली – मुख्यमंत्री शिंदे

बीड (जिल्हा प्रतिनिधी) – शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या पार्थिवावर बीडमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांकडून मेटेंना मानवंदना देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री अब्दुल सत्तार, गिरीश महाजन, धनंजय मुंडे, संदीप क्षीरसागर यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. विनायक मेटेंना अखेरचा निरोप देण्यासाठी बीडकरांनी अलोट गर्दी केली होती. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोटार अपघातात रविवारी विनायक मेटे यांचे निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. मेटे कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याची प्रतिक्रिया यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी आपले आयुष्य वेचले. मराठा आरक्षणासंबंधित बैठकीसाठी येत असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला. हा आघात केवळ मेटे कुटुंबावरच नाही तर संपूर्ण मराठा समाजावर आहे. विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी केलेला लढा वाया जाऊ देणार नाही. मराठा आरक्षणासाठी जे जे करावे लागेल ते सर्व हे सरकार करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेटे यांच्या कार्यकर्त्यांना आणि संपूर्ण मराठा समाजाला दिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मराठा आरक्षणासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी विनायक मेटे हे रात्रीच रवाना झाले. बीडमध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते. सर्व कार्यक्रम रद्द करून विनायक मेटे हे मुंबईला रवाना झाले होते. यावेळी पहाटे पाच वाजता त्यांच्या गाडीला अपघात झाला. अपघातानंतर तब्बल एक तास त्यांना मदत मिळाली नसल्याचे त्यांच्या गाडीच्या चालकाने सांगितले. त्यांनी अखेर मुंबईतील एमजीएम रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला होता.


दरम्यान, विनायक मेटे यांच्या पत्नी डॉक्टर ज्योती मेटे यांनीही पतीच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे. ‘मी स्वत: डॉक्टर असल्यामुळे साहेबांना पाहिल्याबरोबर माझ्या लक्षात आले की काहीतरी वाईट घडलंय. कारण मेडिकल टर्मीनोलॉजीनुसार, मृत्यूनंतर माणूस एवढ्या लवकर पांढरा पडत नाही. काही वेळ गेल्यानंतर तो पांढरा पडतो. पण साहेबांचा चेहरा अतोनात पांढरा पडला होता’ असे ज्योती मेटे यांनी ‘एबीपी माझा’ या मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. ‘अपघाताबाबतची माहिती मिळाल्यानंतर मी धावत सुटले. मदतीसाठी मी विश्वास नांगरे पाटील यांना फोन केला. माझा भाऊ पोलिसात उच्चपदावरचा अधिकारी आहे, मी त्यालाही फोन करण्याचा प्रयत्न केला, पण दोघांनीही फोन उचलला नाही,’ अशी प्रतिक्रिया विनायक मेटेंच्या पत्नीने दिली. ‘मी ड्रायव्हरला फोन करत होते, पण तो मला अपघात कुठे झाला याचे नेमके लोकेशन सांगत नव्हता. मी त्याला व्हॉट्सअपवर लोकेशन पाठवयाला सांगितले, पण त्याने तेही केले नाही. अखेर मी वाहतूक पोलिसांना फोन केला, त्यांनी साहेबांना एमजीएम हॉस्पिटलमध्ये नेल्याचे सांगितले,’ असे वक्तव्य ज्योती मेटे यांनी केले.
———–

Share This Article
Exit mobile version