सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – सिंदखेडराजा तालुक्यातील ऐतिहासिक आडगावराजा गावात आज झालेल्या विशेष ग्रामसभेत शेतकऱ्यांचा आक्रोश ठाम ठरावाच्या रूपाने समोर आला. गावकऱ्यांनी एकमुखी ठराव करत शासनाकडे आडगाव राजा सह सुलजगाव परिसर ओला दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी केली. या ठरावाची प्रत तहसीलदार सिंदखेडराजा यांना सादर करण्यात आली.
ग्रामसभेचे अध्यक्षस्थान सरपंच सौ. रंजना संतोष चव्हाण यांनी भूषविले. तर ग्रामपंचायत अधिकारी जगन्नाथ नागरे यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाविषयी सविस्तर माहिती देत गावाला समृद्ध करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी गावातील शेतकऱ्यांची बिकट अवस्था, पिकांचे झालेले मोठे नुकसान आणि सततच्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाली. ग्रामस्थांनी स्पष्ट शब्दांत शासनाकडे मागणी केली – “आडगाव राजा सह संपूर्ण परिसर ओला दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे.” या मागणीस सभेत उपस्थित सर्वांनी एकमुखी समर्थन दिले. ग्रामसभेला तलाठी बी. बी. गिरी, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गायके सर, शिक्षक विनोद ठाकरे, पोलिस पाटील निलेश शिनगारे यांच्यासह गावातील मान्यवर उपस्थित होते. तलाठी गिरी यांनी आडगाव राजा शिवारातील पादण रस्त्यांची माहिती सभेसमोर मांडली. ग्रामस्थांनी या रस्त्यांना एकमुखी मंजुरी दिली. शिक्षक विनोद ठाकरे यांनी आपल्या मनोगतातून ग्रामस्थांना विश्वास दिला – “आपली जिल्हा परिषद शाळा गुणवत्तेत कोणत्याही इंग्रजी शाळेपेक्षा कमी नाही. आपल्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी शाळेच्या विद्यार्थ्यांशी बरोबरी करत पुढे यावे.” त्यांच्या या आत्मविश्वासपूर्ण भाषणाला ग्रामस्थांकडून टाळ्यांचा कडकडाट मिळाला. ग्रामसभेत मंजूर ठराव निवासी नायब तहसीलदार प्रांजळ पवार सिंदखेडराजा यांच्याकडे रुस्तुमराव झोरे, ज्ञानेश्वर खंडारे, संतोष किंगरे (सरपंच सुलजगाव), रामदास कहाळे, गजानन राजे जाधव, श्याम काळे, निलेश शिनगारे, माधव विणकर, रमेशराव शिंदे, जगन्नाथ नागरे (ग्रामपंचायत अधिकारी) यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आला. ग्रामस्थ, शेतकरी, महिला व युवक मोठ्या संख्येने हजेरी लावून आपल्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर एकजुटीने ठराव मंजूर केल्याचे चित्र या ग्रामसभेत दिसून आले.