सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – तालुक्यातील शेतकर्यांची पिके सततच्या मुसळधार पावसामुळे जलमय होऊन मोठ्या प्रमाणात नष्ट झाली आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडून गेले असून, त्यांच्या पुनर्वसनासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेतर्पेâ आज (दि.१७) तहसीलदार अजित दिवटे यांच्यामार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले. शासनाने शेतकर्यांच्या आक्रोशाची दखल घेऊन तातडीने मदतीची पावले उचलावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या निवेदनात पुढील मागण्या नमूद आहेत, ओला दुष्काळग्रस्त शेतकर्यांना एकरी किमान ५० हजार रुपये मदत द्यावी. सिंदखेडराजा तालुक्याला ‘ओला दुष्काळग्रस्त तालुका’ घोषित करावे. काटेरी कुंपण योजनेतील ९० टक्के अनुदानासाठी ग्रामपंचायत ठरावाची अट रद्द करून योजना सर्व शेतकर्यांसाठी खुली करावी. नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रातील शेतकर्यांचाही समावेश या योजनेत करावा. पीकविमा योजना तात्काळ जाहीर करून खरीप व रब्बी हंगामातील थकबाकी विमा रक्कम शेतकर्यांना द्यावी. शेतकर्यांचे कर्ज सरसकट माफ करून पुढील पेरणीसाठी थेट आर्थिक मदत करावी. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील शेकडो हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्याखाली गेली असून, शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत. पुढील हंगाम वाचविण्यासाठी शासनाने तात्काळ मदतीचा निर्णय घेणे अपरिहार्य असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले. क्रांतिकारी शेतकरी संघटनेने शासनाने त्वरित सकारात्मक निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.