बुलढाण्यात ओबीसी समाजाकडून सरकारच्या ‘जीआर’ची होळी!

admin 3 Min Read
3 Min Read

– मराठा समाजाला ओबीसीत समावेशास तीव्र विरोध!
– ओबीसी समन्वय समितीतर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन

बुलढाणा (राजेश लोखंडे) – ओबीसी समन्वय समिती बुलढाणा यांच्यावतीने काल, दि.१५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. प्रगत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामावून घेऊ नये, तसेच शासनाने २ सप्टेंबररोजी काढलेला जीआर तातडीने रद्द करावा, या प्रमुख मागणीसह ओबीसी महामंडळाकडून थेट ५ लाख कर्ज रुपये देण्यात यावेत, ओबीसी जातीनिहाय जनगणना व न्या. रोहिणी आयोग लागू करण्यात यावा, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. तसेच, यावेळी ओबीसी समाजाने राज्य सरकारने काढलेल्या जीआरची होळीदेखील केली.

या आंदोलनात जिल्ह्यातील ओबीसी समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. शासनाच्या अन्यायकारक धोरणांविरोधात घोषणाबाजी करत समाजबांधवांनी आपला तीव्र रोष व्यक्त केला. ओबीसी समाज समितीचे समन्वयक, मोर्चाचे आयोजक, तथा सुतार व बारा बलुतेदारांचे नेते सतिश शिंदे यांनी सांगितले, की ‘मराठा समाजाच्या महामंडळाला हजारो कोटी रुपयांचा निधी मिळतो, मात्र ओबीसी महामंडळाला तुटपुंजा निधी देऊन थातूर-मातूर मदत केली जाते. ओबीसी प्रवर्गात तब्बल ३७४ जाती आहेत. एवढ्या मोठ्या समाजघटकाला न्याय मिळणे अपेक्षित असताना शासन सातत्याने ओबीसींवर अन्याय करत आहे. २ सप्टेंबरच्या जीआरमुळे ओबीसी समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, समाजाचा हक्क हिरावला जात असल्याची भावना जनमाणसात निर्माण झाली आहे.’ शिंदे यांनी ठाम भूमिका घेत स्पष्ट केले की, ‘ओबीसी, मायक्रो ओबीसी व समाजातील कष्टकरी वर्गाच्या चळवळीसाठी प्रसंगी बलिदान द्यायची वेळ आली तरी आम्ही मागे हटणार नाही. शासनाने तातडीने समाजाच्या भावना लक्षात घ्याव्यात, अन्यथा पुढील काळात व्यापक व तीव्र आंदोलन उभारले जाईल.’ या आंदोलनामध्ये दामोदर काका बिडवे प्रदेश उपाध्यक्ष बारा बलुतदार महासंघ, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ खांडेभराड, समता परिषदेचे राज्य सल्लागार प्रा. सदानंद माळी सर, माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विजय खरात, गुरव समाजाचे जिल्हाध्यक्ष गोपा सोनटक्के, लोहार समाजाचे नेते प्रकाश सुरडकर, शिवसेना नेते, श्रीरामभाऊ झोरे, विजयभाऊ जागृत, प्रकाशभाऊ सपकाळ सुनील शेजुळकर, समाधान जंजाळकर, प्रवीण भुतेकर, विजय भुतेकर, डॉक्टर विजय खोलाडे, एकनाथ खानजोडे, राजेश इंगळे, नारायण जाधव, भास्कर पंडित अरविंद खांडेभराड, प्रवीण भुतेकर, अंकुश मुर्‍हेकर, राजूभाऊ पांडे, रमेश जावळे, गणेश सोनवणे, संजय सपकाळ, गजानन जवळकर, रामभाऊ अवचार, अभय तायडे, राजेश मेहत्रे, प्रकाशभाऊ सपकाळ, धनंजय चाफेकर, गजानन नावकर सर, नारायण हाके, सुतार समाजाचे जिल्हाध्यक्ष अनंत राऊत आदींसह इतर असंख्य ओबीसी बांधवांची उपस्थिती होती. सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या धरणे आंदोलनाला ओबीसी समाजातील विविध घटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तरुण, महिला व मायक्रो ओबीसी घटकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती ही या आंदोलनाची ताकद ठरली, आणि सदर ओबीसी समन्वय समितीच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हाभर ओबीसी चळवळीचे बांधणीसुद्धा केला जाणार आहे. या आंदोलनाच्या निमित्ताने ओबीसी व मायक्रो ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात जागृत झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

Share This Article
Exit mobile version