धो धो पावसात असंख्य पाणावलेल्या डोळ्यांनी दिला प्रभावती(काकू) शिंगणे यांना अखेरचा निरोप!

admin 5 Min Read
5 Min Read

– माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिला मुखाग्नि; अखेरचा निरोप देण्यासाठी लोटला जनसागर!
– सर्वच क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती; दि.१८ सप्टेंबरला रक्षाविसर्जन विधी

बुलढाणा/ साखरखेर्डा (अशोक इंगळे) – धो धो पावसांत असंख्य पाणावलेल्या डोळ्यांनी जिल्हा सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षा, जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील समर्पित व्यक्तिमत्व प्रभावती (काकू) भास्करराव शिंगणे यांना अखेरचा निरोप दिला. त्यांचे सुपुत्र तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी त्यांना मुखाग्नि दिला. यावेळी शिंगणे परिवारासह जिल्हा व राज्यभरातील मान्यवरांची भरपावसात उपस्थिती होती. प्रभावतीकाकू अमर रहे..च्या घोषणांनी भरलेले आभाळदेखील निनादून गेले होते.

भरपावसात भावविभोर सूत्रसंचलन करताना कवीवर्य अजिम नवाझ राही.

काल, दि. १५ सप्टेंबर २०२५ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील एक महान अध्याय संपला. डोळ्यांत अश्रू, अंतःकरणात भावनिक आठवणी, मनामध्ये कृतज्ञतेची भावना आणि हृदयात असह्य पोकळी घेऊन संपूर्ण जिल्ह्याने प्रभावती भास्करराव शिंगणे काकूंना अखेरचा निरोप दिला. पावसाच्या सरींनी आकाश रडले होते आणि जमलेल्या हजारो जनसमुदायाने डोळ्यांत पाणी आणून आपल्या मातृसमान आधारवडास अंतिम प्रवासाला साश्रूनयनांनी निरोप दिला. आज बुलढाण्यात फुलांनी सजविलेल्या रथातून अंत्ययात्रा निघाली तेव्हा संपूर्ण रस्ते चाहत्यांच्या गर्दीने व्यापले होते. धो धो पाऊस कोसळत होता, त्रीशरण स्मशानभूमी अगोदरच चाहत्यांच्या उपस्थितीने गच्च भरली होती. पाऊस कोसळत असतांनाही मिळेल त्या आडोशाला, कोणी छत्री घेऊन उभा होता. प्रत्येकाच्या डोळ्यात धारा होत्या. माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी आईला मुखाग्नि दिला. त्यावेळी संपूर्ण शिंगणे परिवाराने एकच हंबरडा फोडला. यावेळी माजी मंत्री डॉ. रणजीत पाटील, माजी मंत्री गुलाबराव गावंडे, आमदार धीरज लिंगाडे, लक्ष्मण घुमरे, संतोष आंबेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळाभाऊ भोंडे, माजी आमदार धृपदराव साळवे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. विकास मिसाळ, सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा इसरूळचे सरपंच सतिश पाटील भुतेकर, अरूण वाघ, माजी कृषी सभापती दिनकरराव देशमुख, गजानन नाताळ, प्रसेनजीत पाटील, नरेश शेळके, डी डी अंभोरे, संजय गाडेकर यासह जिल्ह्यातील सहकार, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नेते, चाहतावर्ग उपस्थित होता. या अंत्यविधीचे भावविभोर सूत्रसंचलन प्रख्यात निवेदक तथा कवी अजीम नवाज राही यांनी केले.


प्रभावतीकाकू म्हणजे राजकारणापलिकडचे मातृहृदयी संवेदनशील तितकेच कणखर नेतृत्व!

प्रभावती काकूंचं जीवन म्हणजे केवळ एका कुटुंबापुरतं सीमित नव्हतं, त्या संपूर्ण जिल्ह्याच्या मातोश्री होत्या. त्या माजी आमदार व महाराष्ट्र मार्वेâटिंग फेडरेशनचे अध्यक्ष सहकार महर्षी स्व. भास्करराव शिंगणे यांच्या समर्पित सहचारिणी, तर महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री व जिल्ह्याचे आधारवड डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या मातोश्री होत्या. परंतु काकूंचा गौरव केवळ इतकाच नाही. त्या जिल्ह्याच्या प्रत्येक घराघरात, प्रत्येक मनामनात एक आपुलकी, आश्रय आणि प्रेरणा म्हणून जिवंत होत्या. १ डिसेंबर १९४७ रोजी प्रभावती काकूंचा जन्म डोंगरशेवली येथे सावळे कुटुंबात झाला. साधेपणा, कष्टाळूपणा आणि माणुसकी हे या कुटुंबाचे वैशिष्ट्य. लहानपणीच काकूंमध्ये शिस्त, करारीपणा आणि जबाबदारीची जाणीव दिसून येत होती. गावाकडच्या संस्कारांनी आणि घरातील जिव्हाळ्याच्या वातावरणाने त्यांचं व्यक्तिमत्त्व आकार घेत होतं. लहान वयापासूनच त्या कुटुंबासाठी आधार बनल्या. अभ्यासाबरोबरच घरकाम, नातेवाईकांप्रती आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी या गुणांनी त्यांची छाप उमटवली. काकूंच्या जन्मकुलात माणुसकीची आणि धर्मशीलतेची परंपरा होती. त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच दुसर्‍यांना मदत करणे, दुःखात सहभागी होणे आणि गरजूंच्या पाठीशी उभे राहणे या गोष्टी सहजपणे आत्मसात झाल्या. प्रभावतीकाकूंचा विवाह बुलढाणा जिल्ह्याच्या इतिहासात एक महत्वाची छाप उमटवून गेलेल्या माजी आमदार व सहकार महर्षी स्व. भास्करराव शिंगणे यांच्याशी झाला. विवाहानंतर काकूंनी केवळ संसारच नव्हे, तर एका मोठ्या सामाजिक आणि राजकीय घराण्याची जबाबदारीही पार पाडली. शिंगणे साहेब हे सहकार क्षेत्रातील महानायक. जिल्ह्याच्या आर्थिक आणि सामाजिक उभारणीसाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. अशा महान व्यक्तीच्या जीवनात प्रभावती काकू या केवळ पत्नी नव्हत्या, तर त्या त्यांच्या प्रत्येक पावलावरच्या साथीदार, मार्गदर्शक आणि प्रेरणास्रोत होत्या. घरातील कामकाज सांभाळतानाच काकूंनी सहकाराच्या कार्यात, समाजकार्याच्या उपक्रमात आणि लोकसेवेत त्यांना मोलाची साथ दिली. मोठे साहेब गेल्यानंतर शिंगणे परिवाराला आणि जिल्ह्याला मोठा धक्का बसला. पण या आघातातून कुटुंबाला उभारी देण्याचं काम प्रभावती काकूंनी केले. त्यांनी संपूर्ण जिल्ह्याच्या माणसांना आईसारखा आधार दिला. सन २००१ ते २००५ दरम्यान त्यांनी बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या अध्यक्षा म्हणून जबाबदारी स्वीकारली. सहकारी क्षेत्रात महिलांचं नेतृत्व हे तेव्हा दुर्मीळ होतं. पण काकूंनी आपल्या कर्तबगारीने, प्रामाणिकपणाने आणि दूरदृष्टीने बँकेच्या कार्याला गती दिली. शेतकरी, महिला, सर्वसामान्य कुटुंब यांच्यासाठी सहकार हे आधारस्तंभ व्हावं, यासाठी त्यांनी कार्य केले. त्यांच्या नेतृत्वामुळे जिल्ह्यात अनेक सहकारी संस्थांची उभारणी झाली. लोकांच्या मनात विश्वास निर्माण झाला की, ‘ही आपलीच आई आहे जी आपल्यासाठी काम करते. प्रभावती काकूंनी आपल्या पतीच्या पश्चात मुलगा डॉ. राजेंद्र शिंगणे आणि गणेश शिंगणे यांना राजकीय क्षेत्रात उभं राहण्यासाठी सतत प्रेरणा दिली. गणेश शिंगणे यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या दु:खांला सीमाच राहिली नाही. तरीही डॉ.राजेंद्र शिंगणे हे जेव्हा जिल्ह्याच्या, राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात काम करू लागले तेव्हा त्यांच्या मागे आईचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन सदैव होतं. आई म्हणून काकूंनी मुलांना केवळ संस्कारच दिले नाहीत, तर समाजकारणाची जाणही दिली. राजकारणात प्रामाणिकपणा, समाजाशी नाळ जोडलेली असावी, हेच त्यांनी नेहमी शिकवले.

Share This Article
Exit mobile version