राज्यातील तीन पदवीधर मतदारसंघासह दोन शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल पुढील वर्षी!

admin 3 Min Read
3 Min Read

– मतदारयाद्या नव्याने तयार करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश!
– महायुती व महाआघाडीकडून जागावाटपांचीही चाचपणी सुरू!

मुंबई/बुलढाणा (बाळू वानखेडे) – राज्यातील पुढीलवर्षी मुदत संपणार्‍या नागपूर, पुणे, औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ तसेच अमरावती व पुणे विभाग शिक्षक मतदार संघासाठी निवडणूक होणार आहे. त्यादृष्टीने निवडणूक आयोग कामाला लागला असून, याबाबत राज्य निवडणूक आयोगाने संबंधित विभागीय आयुक्त यांना सदर निवडणुकीसाठी मतदारयाद्या नव्याने तयार करण्याचे आदेश दि.१२ सप्टेंबररोजी दिले आहेत. यापूर्वी ही निवडणूक नोव्हेंबर 2020 मध्ये झाली होती. त्यात महाविकास आघाडीचा वरचष्मा दिसून आला होता. आता या जागा जिंकण्यासाठी सत्ताधारी महायुतीने जोरदार कंबर कसली आहे.

राज्यात पुढील काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुराळा उडणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकासाठी राज्य निवडणूक आयोगाने तयारी चालवली असतानाच, आता पुढील वर्षी नोव्हेंबर २०२६ मध्ये औरंगाबाद, पुणे, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ तसेच अमरावती व पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक होणार आहेत. त्यादृष्टीने राज्य निवडणूक आयोग कामाला लागल्याचे दिसून येते आहे. याबाबत दि.१२ सप्टेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने संबंधित विभागीय आयुक्त व मतदार नोंदणी अधिकारी यांना सदर निवडणुकीसाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार मतदार नोंदणी सूचना प्रसिद्ध करणे ३० सप्टेंबर, वर्तमानपत्रातील मतदार नोंदणी नोटीस प्रसिद्धीची प्रथम पुनर्प्रसिद्ध १५ ऑक्टोबर, द्वितीय पुनर्प्रसिद्धी २५ ऑक्टोबर, दावे, हरकती स्वीकारण्याचा अंतिम दिनांक ६ नोव्हेंबर, प्रारूप मतदार यादी छपाई २० नोव्हेंबर, प्रारूप मतदार याद्या प्रसिद्धी २५ नोव्हेंबर, दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर, दावे व हरकत निकाली काढणे, पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे २५ डिसेंबर तसेच ३० डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यामध्ये १ नोव्हेंबर २०२५ या दिनांकावर आधारित उपरोक्त कार्यक्रमानुसार नव्याने मतदारयाद्या तयार करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव प्रशांत नावगे यांनी दिले आहेत.


  • – राज्यात आता शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटप सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीनेदेखील प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात यांनी नुकतीच ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.
  • – पुणे शिक्षक मतदार संघातून जयंत आसगावकर, पुणे पदवीधर मतदारसंघातून अरूण लाड, नागपूर पदवीधर मतदारसंघातून अभिजित वंजारी, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतिष चव्हाण तर अमरावती शिक्षक मतदार संघातून किरण सरनाईक निवडून आलेले असून, यातील बहुतांश आमदार हे महाविकास आघाडीचे आहेत.

राज्यात विधान परिषद या वरिष्ठ सभागृहाचे एकूण 78 सदस्य आहेत. यातले 31 सदस्य म्हणजे विधानसभेतले आमदार निवडून देतात, 21 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडले जातात. तर 12 जणांची नेमणूक राज्यपालांकडून होते आणि 7 उमेदवार शिक्षक मतदारसंघातून तर 7 पदवीधर मतदारसंघातून येतात. हे पदवीधर मतदारसंघ आहेत मुंबई, कोकण, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर आणि अमरावती. विधान परिषदेत दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्य निवृत्त होत असतात आणि त्यांच्या जागी नवीन निवडणूक होते.

Share This Article
Exit mobile version