नवी दिल्ली (विशेष राजकीय प्रतिनिधी) – भ्रष्टाचार करणार्यांना शिक्षा देण्यासाठी आता आपल्याला एक समाज म्हणून एकत्र येणे गरजेचे आहे. भ्रष्टाचाराला खतपाणी घालणार्या दंड ठोठावण्यासाठी आपल्याला एकत्र यावेच लागेल. भ्रष्टाचार आणि घराणेशाही हे देशाला लागलेली कीड आहे. जिथे देशभरात गरीब लोक जगण्यासाठी लढत आहे, तिथे आपल्याला भ्रष्टाचाराविरोधात पूर्ण ताकदीने लढावे लागणार आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून काँग्रेसवर निशाणा साधला.
आज देशाचा ७५ वा स्वातंत्र्यदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केले. त्यांच्याहस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले. हे वर्ष भारतासाठी खूप खास आहे आणि संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत म्हणून साजरा करत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलिदान देणार्या हुताम्यांना अभिवादन करत पंतप्रधानांनी देशवासीयांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात, विरोधकांना डिवचले. ते म्हणाले, देशात अनेक गंभीर समस्या आहेत. पण त्यातील दोघांवर मी भाष्य करणार आहे. देशात भ्रष्टाचार आणि घराणेशाही या दोन समस्यांनी ग्रासले आहे. देशाला विकसीत करण्यासाठी या दोन समस्यांना सगळ्यात आधी तोंड द्यावे लागेल, असे त्यांनी सूचित करत, जोपर्यंत भ्रष्टाचाराप्रती घृणा आणि द्वेष प्रत्येक भारतीयाचा मनात निर्माण होत नाही, तो पर्यंत भ्रष्टाचाराची मानसिकता संपवणे कठीण आहे, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे प्रत्येक नागरिकाच्या मनात भ्रष्टाचाराविषयी द्वेष निर्माण होण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. आज आपल्याला दोन मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. भ्रष्टाचार आणि घराणेशाही, भाऊ- भाच्याचे राजकारण सुरू आहे. भ्रष्टाचार ही देशाला लागलेली कीड आहे. आपल्याला त्याविरोधात लढावे लागणार आहे. आपल्याला आपल्या संस्था आणखी ताकदवर कराव्या लागणार आहे, आपली योग्यता ओळखून पुढे जाण्यासाठी घराणेशाहीविरोधात जागरूकता दाखवावी लागणार आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी गांधी घराण्यावर निशाणा साधला.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान देणार्या महिला योद्धांना पंतप्रधानांनी अभिवादन केले. पंतप्रधानांनी म्हटले की, भारतातील महिला काय करू शकतात हे सांगण्याची गरज नाही. स्वातंत्र्यासाठी अनेक वीर महिला योद्धांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण करून प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून येतो. राणी लक्ष्मीबाई, दुर्गाभाभी, बेगर हजरत महल या पराक्रमी महिला योद्धांना अभिवादन. मोदी यांनी भारतीयांनी स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी म्हटले की, भारतातच नाही तर जगभरात कानाकोपर्यात भारतीयांनी राष्ट्रध्वज फडकवत त्याचा मान वाढवला आहे. संपूर्ण जगभरात भारताचा राष्ट्रध्वज अभिमानाने फडकतोय. जगभरात पसरलेल्या सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
पंतप्रधान मोदींनी देशाला दिले पंच प्रण
येत्या काही वर्षांत आपल्याला ‘पंचप्रणां’वर लक्ष केंद्रित करावे लागेल. पीएम मोदी म्हणाले की, विकसित भारत हे आमचे पहिले व्रत आहे. मोठ्या जिद्दीने आणि जिद्दीने पुढे जायचे आहे. दुसरे व्रत म्हणजे गुलामगिरीच्या सर्व खुणा नष्ट करण्याचे, तिसरे व्रत म्हणजे आपल्याला आपल्या वारशाचा अभिमान असायला हवा. चौथे व्रत म्हणजे एकतेची शक्ती. पाचव्या व्रतामध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह नागरिकांची कर्तव्ये आहेत.
———–
मोदी सरकार आत्ममग्न, गांधी, नेहरू, पटेलांच्या नावाने खोटा इतिहास सांगितल्या जातोय; सोनिया गांधींचा हल्लाबोल
सोनिया गांधी यांनी यावेळी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. आम्ही गेल्या 75 वर्षात अनेक मोठी उद्दिष्टे गाठली आहेत. मात्र, हे आत्ममग्न सरकार आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचे महान बलिदान आणि गौरवशाली यशाला तुच्छ लेखण्याचं काम करत आहे. हे कदापि खपवून घेतलं जाणार नाही. राजकीय फायद्यासाठी ऐतिहासिक गोष्टींची मोडतोड केली जात आहे. गांधी, नेहरू आणि पटेल आणि स्वातंत्र्याबाबत चुकीची माहिती दिली जात आहे. आम्ही हे प्रयत्न मोडून काढू. आम्ही त्याचा जोरदार विरोध करू, असं सोनिया गांधी म्हणाल्या. गेल्या 75 वर्षात प्रतिभावंत भारतीयांच्या कठोर मेहनतीच्या जोरावर आपण विज्ञान, शिक्षण, आरोग्य आणि सूचना प्रसारण आदी क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला आहे. प्रत्येक भारतीयांच्या कष्टामुळेच हे साध्य झालं असून म्हणूनच आपण विकासात मोठी झेप घेतली आहे, असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

