– सिंदखेडराजा मतदारसंघासह बुलढाणा जिल्ह्यात शोककळा; माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना मातृशोक! – डोंगरशेवलीतील सावळे घराण्याच्या ‘लेकबाळ’ ते शेंदुर्जन येथील शिंगणे परिवाराच्या ‘कर्तृत्ववान सून’; ‘मोठ्या साहेबांना’ दिली खंबीर साथ! – मंगळवारी बुलढाणा येथील भगिरथ कारखानास्थित स्मृतीस्थळ येथे सकाळी १० वाजता अंत्यविधी
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – सहकारमहर्षी स्व. भास्करराव शिंगणे यांच्या धर्मपत्नी तथा माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या मातोश्री प्रभावतीकाकू शिंगणे यांची आज (दि.१५) दुपारी साडेचार वाजता प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी वार्यासारखी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात पसरताच अनेकांच्या पापण्या ओलावल्या. उद्या, मंगळवारी, दि.१६ सप्टेंबररोजी सकाळी १० वाजता त्यांच्या पार्थिवावर बुलढाणा येथील खामगार रोड त्रीशरण चौक येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
शेंदुर्जन येथील राजघराणे कै.संपतराव शिंगणे ऊर्फ ‘पाहुणे’ यांच्या घराण्यात डोंगरशेवली येथील तालेवार सावळे परिवाराची लेकबाळ भरलेलं माप लवंडून तालेवार शिंगणे परिवाराची सून म्हणून पदार्पण केले. भास्करराव शिंगणे यांच्या धर्मपत्नी म्हणून वावरत असताना सामाजिक, राजकीय प्रवासाचे अनुभव त्यांना येऊ लागले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कै. भास्करराव शिंगणे यांनी प्रशासकीय मॅनेजर म्हणून आपली सुरुवात केली. त्यानंतर देऊळगावमही गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली. जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून काम करीत असताना त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदी नियुक्ती झाली, आणि बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत राहिले. सहकारी बँकेचे शाखा विस्तार करीत असताना शेतकर्यांना मदत करण्याचे धोरण त्यांनी आखले. त्यातूनच सहकार चळवळ गतिमान करण्यासाठी साखरखेर्डा येथे पैनगंगा सहकारी सुतगिरणी उभी केली. सुतगिरणीचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी १९९२ पर्यंत यशस्वी कारभार सांभाळला. बुलढाणा येथील भगिरथ सहकारी मिश्रखत कारखाना उभा केला. एवढेच नाही तर सहकार क्षेत्रात काम करीत असताना बुलढाणा जिल्ह्यातील सहकारी सुतगिरण्या, साखर कारखाने यांना बँकेच्या माध्यमातून पतपुरवठा केला. १९८५ साली सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातून भास्करराव शिंगणे यांनी निवडणूक लढविली आणि ते आमदार म्हणून निवडून आले. त्यावेळी प्रभावतीकाकूंनी पायाला भिंगरी बांधून संपूर्ण मतदारसंघात प्रचारासाठी फिरल्या होत्या. प्रत्येक कामात काकूंनी साहेबांना साथ दिली. डोंगरशेवली माहेर असले तरी ते साळवे घरानेसुध्दा राजकीय वारसा जोपासणारे होते. तोच वारसा प्रभावतीकाकूंनी पुढे सुरु ठेवला. मोठ्या साहेबानंतर राजकीय आणि सहकार क्षेत्रातील जबाबदारी डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्यावर आली. डॉ. राजेंद्र शिंगणे हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले. प्रभावतीकाकू संचालक म्हणून बिनविरोध निवडून आल्या होत्या. सतत १५ वर्षे बँकेचे संचालकपद सांभाळीत असताना सिंदखेडराजा मतदारसंघातून डॉ. राजेंद्र शिंगणे १९९५ साली अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर १९९९ साली पुन्हा आमदार झाल्यानंतर त्यांना राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली. २००० साली जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी प्रभावतीकाकू शिंगणे यांनी यशस्वीपणे सांभाळली. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना त्यांचा चाहतावर्ग खूपच वाढला होता. सहकारमहर्षी कै.भास्करराव शिंगणे यांची कमतरता भासत असतानाही त्यांनी शेतकर्यांना ती उणिव कधीही जाणवू दिली नाही. डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या डोक्यावर मायेचा हात कायम ठेवला. आज काकूंच्या निधनाची बातमी वार्यासारखी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात पसरताच अनेकांच्या शोक संवेदना उमटू लागल्या. सहकार क्षेत्रातील एक आधारवड कोसळल्याने मतदारसंघात शोक व्यक्त केला जात आहे.